Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
Someshwar Karkhana Election Result : अजित पवारांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रातील पहिल्याच मोठ्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांनी 21 पैकी 21 जागा जिंकत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे.

Someshwar Sahakari Sakhar Karkhana Election Results 2026: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलचा सुपडा साफ झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध पुरुषोत्तम जगताप अशी लढत होती. जगताप यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल उभं केलं. मात्र सुनेत्रा पवार या सगळ्यांनाच उजव्या ठरल्या. या निवडणुकीत 21 पैकी 21 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत.
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, राज्यातील उच्चांकी दर देणारा कारखाना अशी याची ओळख. या कारखान्याची निवडणूक देखील तितकीच प्रतिष्ठेची आणि रंगतदार झाली. अजित पवारांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक होती आणि या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे ठाकले. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनेनेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आणि पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या सहाय्याने केलेल्या पॅनेलला अस्मान दाखवलं आणि 21 च्या 21 जागांवर आपला विजय पक्का केला.
एकूण तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात
1) राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल
2) शरद पवार गटाचा सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल
3) पुरूषोत्तम जगताप याचे लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल
कसं आहे सोमेश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र?
या कारखान्याचे कार्यक्षेत्र हे पुणे जिल्ह्यातील दोन आणि सातारा जिल्ह्यातील दोन असे तालुके आहेत
सातारा जिल्ह्यातील फलटण आणि खंडाळा तालुका
पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि बारामती तालुका
या कारखान्याचे एकूण सभासद 27 हजार 625
त्यापैकी 23 हजार 393 सभासदांचे मतदान झाले
या निवडणुकीत एकूण 84.25% मतदान झालं
23 हजार 393 पैकी राष्ट्रवादीच्या प्रत्येक उमेदवाराला 12 हजारापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवाराला सरासरी अडीच हजार मते मिळालेले आहेत. तर पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलच्या उमेदवारांना सरासरी साडेपाच ते सहा हजार मतं मिळाली आहेत.
सोमेश्वर कारखान्याचे तेरा वर्ष चेअरमन राहिलेले पुरुषोत्तम जगताप यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत स्वतंत्र भाजपच्या सहाय्याने पॅनेल उभं केलं होतं. भाजपसोबत शरद पवार गटाच्या पुरंदर तालुक्यातील दोन नेत्यांचा देखील पुरुषोत्तम जगताप यांना पाठिंबा होता. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले असल्याचा आरोप पुरुषोत्तम जगताप यांनी केला आणि याचा फटका आपल्याला बसल्याचा आरोप देखील पुरुषोत्तम जगताप यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून या निवडणुकीचे नेतृत्व युगेंद्र पवार करत होते. युगेंद्र पवारांना मात्र या निवडणुकीत उतरल्याने मोठा फटका बसला. पुरंदर तालुक्यातील दोन नेत्यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला असला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सुप्रिया सुळे या निवडणुकीत कुठेच दिसल्यानाहीत. सुप्रिया सुळे सांगता सभेला येणार होत्या, त्यावेळीही त्या आल्या नाहीत. सुप्रिया सुळे दिल्लीत असल्याने त्यांना येता आलं नाही म्हणून ऑनलाईन पद्धतीने त्या जॉईन होणार होत्या. मात्र त्या ऑनलाइन पद्धतीने देखील जॉईन झाल्या नाहीत.
त्याच पद्धतीने निवडणुकीच्या दरम्यान शरद पवारांनी कारखाना कार्यक्षेत्रात दुष्काळी भागाचा दौरा केला. मात्र याचा देखील फायदा त्यांना कुठेच झाला नाही. युगेंद्र पवारांना एकट्याला पॅनलचं नेतृत्व करावं लागलं. पक्षातील स्थानिक नेते या निवडणुकीत न आल्यानं या निवडणुकीत युगेंद्र पवारांचा पक्ष मात्र तीन नंबरला राहिला. सांगता सभेला शशिकांत शिंदे आले. शरद पवार सहकारातलं किती मोठं नाव आहे हे सांगितलं. मात्र त्याचा कुठलाही प्रकारचा फायदा त्यांना झाला नाही..
या सोमेश्वरच्या निवडणुकीत चारही तालुक्यातून राष्ट्रवादीला मोठं मताधिक्य मिळालं. हे मताधिक्य कुणाला तोडता आला नाही. उमेदवारांचे मताधिक्य हे जवळपास सहा हजाराच्या पुढेच राहिलं आहे. या निवडणुकीत पैसे वाटप झाल्याचा देखील मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आला आणि त्यामुळेच हा विजय असल्याचं विरोधकांकडून सांगण्यात आलं.
अजित पवारांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रातली ही पहिलीच निवडणूक होती. ही निवडणूक सुनेत्रा पवारांचं नेतृत्व सिद्ध करणारी होती. त्यामुळे जय पवार आणि सुनेत्रा पवार पायाला भिंगरी लावल्यासारखे कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये फिरत होते आणि त्यांचा त्यांना यश मिळालं. अर्थात या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटपाचा आरोप देखील झाला. मात्र सुनेत्रा पवारांनी कसं का होईना पण आपलं या निवडणुकीमध्ये नेतृत्व सिद्ध केल आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांच्या पॅनेलला आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलला उजवी ठरली आणि या दोघांचा दारुण पराभव झाला. आगामी काळात सुनेत्रा पवारांची वाटचाल आणखीनच संघर्षाची असेल, कारण विजय जरी मिळाला असला तरी बारामतीतील आव्हाने कमी झाली नाहीत.
ही बातमी वाचा:






















