Pune Mahanagarapalika Election 2026 candidate Suicide:पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना राजकीय वर्तुळात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 41 मधील उमेदवार फारुख शेख (Farooq Shaikh) यांच्या टॉर्चरमुळे हडपसरमधील सादिक उर्फ बाबू कपूर (वय 56) या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सादिक कपूर यांनी त्यांच्या कार्यालयात आत्महत्या केल्याचे समजते. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही राजकीय नेत्यांना पत्र लिहून आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता. सादिक उर्फ बाबू कपूर याने 1 जानेवारीला काँग्रेसचे नवनिर्वाचित नेते प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांना पत्र लिहल्याची माहिती समोर आली आहे. सादिक यांच्या आत्महत्येची बातमी समजताच प्रशांत जगताप यांनी हळहळ व्यक्त केली. 

प्रशांत जगताप यांनी या सगळ्या प्रकारासंदर्भात संतापही व्यक्त केला. फारुख इनामदार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आहे. त्यांच्या पक्षातील लोकांना फारुख इनामदार याला साथ देत असतील तर मी त्यांच्याविरोधात लढणार, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले. आपल्यामुळे एखादा कार्यकर्ता जर असा जीव देत असेल तर हे अत्यंत वाईट आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली आहे. 1 जानेवारीला हे लेटर प्रशांत जगताप यांच्याकडे पाठवण्यात आले होते. काल रात्री हे लेटर प्रशांत जगताप यांनी वाचलं. त्यानंतर सादिक कपूर यांनी आत्महत्या केल्याचा प्रशांत जगताप यांना कळाले. जर मी दोन दिवस आधीच हे पत्र मी वाचलं असतं, तर मी सादिक कपूर याला वाचवू शकलो असतो, असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले. निवडणूक झाल्यावर या कपूर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार आणि त्यासाठी हायकोर्टात देखील जाणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.

Prashant Jagtap Pune: सादिक शेख यांनी प्रशांत जगतापांना पाठवलेल्या 'त्या' पत्रात नेमकं काय?

माननीय प्रशांत जगताप साहेब

फारुख यासीन इनामदार हा टिपू टोळी पठाण टोळीचा आका आहे. तो अजित पवार साहेबांच्या नावाखाली आजच्या काळात गोर-गरिबांच्या जमिनी लाटण्याचे काम करत आहे. त्याने गोरगरीब लोकांचे जगणे मुश्कील करुन टाकले आहे. त्याने घरं-कुटुंब उद्ध्वस्त करुन सोडली आहेत. साहेब माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला  आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे आणि माझी 10 कोटीची जमीन हडप करण्याच्या तयारीत आहे. साहेब त्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना खरेदी केले आहे. फारुख यासीन जामदार, जहुर मोहम्मद सय्यद, अॅड कबीर शेख, पोलीस अधिकारी धनाजी टोणे, डॉ. राजकुमार शिंदे, हॅरी स्वामी या मुख्य आरोपींनी फाशीची शिक्षा अपेक्षित आहे.

Pune crime news: हडपसरमध्ये नेमकं काय घडलं?

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सादिक उर्फ बाबू कपूर (वय 56) यांनी त्यांच्या कार्यालयात आत्महत्या केली. सादिकने मरण्यापूर्वी आपल्या हाताच्या पंजावर काहीतरी मजकूर लिहला होता. तसेच त्याने एकूण 30 पानांची सुसाईड नोट लिहली असून त्यामध्ये आपण आत्महत्या का केली, याचे सविस्तर कारण नमूद केले आहे. या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 41 मधील उमेदवार फारुख शेख यांच्या नावाचाही उल्लेख आहे. पुण्यातील सय्यद नगर भागात पाच गुंठे जमीन होती. यावरुन फारुख शेख आणि सादिक उर्फ बाबू कपूर यांच्यात वाद सुरु होता. त्याच वादातून फारुख शेख यांच्याकडून सादिक यांना त्रास दिला जात होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. मात्र, मरण्यापूर्वी सादिक यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये अनेक व्यक्तींची आणि पोलिसांची नावं आहेत. याप्रकरणी पुण्यातील लष्कर चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणात पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

ण्यातील उमेदवाराच्या टॉर्चरला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवलं, मरताना अंगावर त्रास देणाऱ्यांची नावं लिहली, पुण्याच्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये काय घडलं?