दिल्ली : नीट पेपरफुटीच्या प्रकरणानंतर कॉकरोच जनता पार्टीच्यावतीने (CJP) दिल्लीत एका महिन्यापासून आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) या आंदोलनाला आता मोठं यश आलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी काल (२५ जुलै) शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीकडून हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला होता. यानंतर काल धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राजीनामा दिला. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं होतं, त्याचबरोबर त्यांनी केलेल्या कामांची काही माहिती देखील फडणवीसांनी दिली होती, फडणवीसांच्या या पोस्टला उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. (CJP)
Rohit Pawar: काय म्हणालेत रोहित पवार?
मा. देवेंद्र फडणवीस साहेब, शिक्षणव्यवस्थेची वाट लावणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांचं कौतुक आपण करत असाल, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याचं आपण सांगत असाल तर याला काय म्हणावं? राजीनामा त्यांच्या चुकीमुळे दिलेला नाही तर त्यांनी उपकार केला आहे, हे आपल्याला सुचवायचंय का? गेले महिनाभर महिलांसह हजारो युवकांना लाठ्या काठ्या खाल्ल्या, २०-२५ दिवसांचं उपोषण करावं लागलं, काहींनी pellet gun चा सामना केला तर कुणी छर्रेच्या गोळ्या खाल्ल्या… आजही अनेक जण दवाखान्यात उपचार घेत आहेत, या सगळ्याबाबत आपल्याला कधी सहानुभूती वाटली नाही, पण आज धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल सहानुभूती वाटत आहे. किती अंधभक्ती करणार? असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
Devendra Fadnavis : संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा - देवेंद्र फडणवीस
“धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणांची अंमलबजावणी केली. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ लागू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ‘पीएम श्री’ शाळांचा उपक्रम, आयआयटींचा विस्तार आणि प्रवेश परीक्षांचा १९ भाषांपर्यंत विस्तार यांसारख्या अनेक सुधारणा त्यांनी अंमलात आणल्या. व्यापक जनहिताप्रती आपली वचनबद्धता दर्शवत त्यांनी आज (२५ जुलै) राजीनामा सादर केला. त्यांनी (धर्मेंद्र प्रधान) वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं, हेच एका खऱ्या भाजपा कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण भाजपा परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला काल (शनिवारी, ता 25) अखेर यश आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. कॉकरोच जनता पार्टी आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असा इशारा देत आंदोलन आणखी तीव्र करण्याची इशारा दिला होता. दिल्लीतील या आंदोलनाचे लोण मुंबई, राजस्थान, बिहार, गुवाहाटी अशा सर्वच राज्यांमध्ये पसरले होते. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढून केंद्र सरकाविरोधात असंतोष वाढत चालला होता. त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे.
दरम्यान, धर्मेंद प्रधान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये, देशाची एकता टिकून राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यास व करिअर बनवण्यावर घालवावा, याच विचाराने मी माझा राजीनामा मा. पंतप्रधानांकडे पाठवून दिला आहे.
