दिल्ली: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला. अजित पवारांनंतर आता पक्षाचे अध्यक्ष हे प्रफुल पटेल (Praful Patel) आहेत अशा वावड्या उठल्या. त्यावर पटेलांनी स्पष्टीकरणही दिलं, त्यानंतर कोणीही दुसरा मराठी नेता राष्ट्रवादीचा नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष करा पण प्रफुल पटेल (Praful Patel) नको असंही काही नेत्यांनी म्हटलं. त्यावरती संताप व्यक्त करत प्रफुल पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील जनतेकडून त्यांनी कधी एक मतही मिळवण्याचा प्रयत्नही केलेला नाही, ते लोक आमच्यासारख्या लोकांबद्दल उलट सुलट बोलतात, प्रचार करतात,चर्चा करतात, वक्तव्ये करतात, ते योग्य आहे का? 1952 पासून माझ्या वडीलांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिले, मी अनेकदा महाराष्ट्रातील जनतेकडून निवडून गेलो, आमच्याबद्दल आणि आमच्या पार्श्वभूमीबद्दल कमेंट करत असतील तर त्यांना लाज वाटली पाहिजे, अशी गोष्टी ते करत आहेत, असंही पुढे पटेल म्हणाले आहेत.(Praful Patel) 

मी एक जनप्रतिनिधी म्हणून तुमच्यासमोर बसलो आहे. पक्षाचा निर्णय योग्य होईल, योग्य दिशेने होईल आणि योग्य व्यक्तीने होईळ आणि माझ्याशिवाय होईल यापलिकडे मी काय म्हणावं, आमच्याकडून काहीही आलेलं नसताना उगाच बोलणं आणि वादळ निर्माण करणं, आणि आमच्या पक्षात संशय निर्माण करणं ही घाणेरडी गोष्ट आहे मला यापलिकडे काही बोलायचं नाही, मी आणखी काय खुलासा करू, माझ्याशिवाय पक्षाचा कोणीतरी असेल, अजितदादांनंतर कोण, कसं, कधी ही जबाबदारी माझ्यावर आहे, ती जबाबदारी मी पार पाडेन असंही पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.

विलीनीकरणाच्या चर्चेवर पटेल नेमकं काय म्हणाले?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरती पटेल म्हणाले, विलीनीकरणाबाबत अजितदादांची माझ्याशी काही चर्चा झाली की नाही. त्यांचीच चर्चा झाली असं लोक म्हणत आहेत. विलीनीकरणाबाबत आम्हाला माहीत नाही असं होऊ शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात प्रत्येक पक्षाने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवगेळी भूमिका घेतली. काही ठिकाणी आम्ही भाजपसोबत राहिलो. काही ठिकाणी शिंदेंसोबत राहिलो. स्थानिक स्वराज्यमध्ये दादांनी सांगितलं आपण सर्व वेगवेगळे लढत आहोत. आपली मते विभागली तर फरक पडू शकतो. त्यामुळे शरद पवार गटाशी बोलून समन्वय घडवू असं अजितदादा म्हणाले होते. तेवढीच चर्चा झाली, असे सांगत प्रफुल्ल पटेल यांन विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या. तसचे दादांचे मी दोन इंटरव्ह्यू बघितले. त्यात त्यांनी स्पष्ट केलं होतं की आमच्यासमोर विलीनीकरणाचा प्रस्ताव नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. तसेच फक्त स्थानिक स्वराज्यसाठी ती युती होती. शरद पवार यांना आम्ही भेटतो. सुप्रिया ताईंना भेटतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरेंच्या पोस्टवरती बोलताना म्हणाले...

राज ठाकरे वाकरे माझ्या पक्षाचे आहेत का? त्यांनी ठरवायचं आहे का? माझ्या पक्षाचा विधिमंडळाचा नेता कोण? अध्यक्ष कोण हे आम्ही ठरवायचं की, राज ठाकरे किंवा इतर कोण जे आहेत सकाळी नऊ वाजताचे बुलेटीन वगैरे, वगैरे हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात आम्ही आमच्या पक्षांमध्ये काय करायला पाहिजे, आम्ही आधीपासून योग्य निर्णय घेतलेला आहे आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत असेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले. 

विलीनीकरणाबद्दल बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, तो विषय आत्ता नाही, पहिला आमचा पक्ष, आमचं घर, आमचा विधिमंडळ हे सगळं  सेटल केल्यानंतर बाकीचे काही असेल तर त्या विषयावर तेव्हा बघू. आज तो विषय आमच्यापुढे नाही. आमच्याकडे एवढाच विषय आहे पहिले आमचा विधिमंडळाचा निर्णय होईल, उपमुख्यमंत्री पद, त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून मी आमच्या पक्षाचा निर्णय घेणार आहे, ही जबाबदारी माझ्यावर आहे पुढच्या प्रोसेस पूर्ण करायच्या आहेत, त्या मी पार पाडत आहे, त्याबद्दल आम्ही प्रोसेस करत असताना लोक उलट सुलट बातम्या करत आहेत, विनाकारण काही नाव काढत आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये काही तथ्य नाही आणि मी तुम्हाला सांगतो कधीच मी या स्पर्धेमध्ये नव्हतो, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या एकाने जरी माझं नाव घेतलं आहे का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये मी नाही असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राज ठाकरेंची पोस्ट काय?

"महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण  पटेल नाही!"