Praful Patel : जे राजकीय पक्ष आज ईव्हीएमच्या विरोधात टीका करतात, त्यांच्याच युपीए (काँग्रेस) सरकारच्या काळात ईव्हीएम आणण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना ते चांगलं वाटत होतं, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल (Praful Patel ) यांनी काँग्रेसवर टीका केली. SIR म्हणजे मृत पावलेल्या किंवा इतर ठिकाणी गेलेल्या लोकांच्या नावांमध्ये सुधारणा करण्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे. बीएलओ (BLO) मार्फत सर्व राजकीय पक्षांना आक्षेप घेण्याची संधी असून ती प्रक्रिया चालू आहे. प्रक्रिया पूर्ण न होताच ती बोगस आहे असं कसं ठरवू शकता? असा प्रश्न प्रफुल पटेल यांनी SIR संदर्भात होत असलेल्या विरोधकांच्या आरोपावर केला. तरुण पिढीचा जो आरोप होतोय त्याचीही नोंद घेतली जात असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी मांडली. संकटाच्या या काळात विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु असल्याचेही ते म्हणाले.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात उद्या कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आवाहन करण्यात आलेलं आहे. याला विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला असून याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी विरोधकांवर चांगलीच टीका केली. भारतातील लोकशाही किती मजबूत आहे, हे आपण गेल्या 80 वर्षांत पाहत आलोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जोपर्यंत भारत देशात आहे, तोपर्यंत सर्व नागरिकांसाठी कायमस्वरुपी लागू राहणार आहे. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींच्या काळातही लोकांनी लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या मताची खरी किंमत दाखवून दिली होती.
बोनसच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी लवकरच भेट घेऊन तातडीनं तो देण्यासाठी प्रयत्न करणार
धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बोनसच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली. विधानसभेत घोषणा झालेला बोनस शेतकऱ्यांना तातडीने मिळावा यासाठी आम्ही बांधिल आहोत. लवकरात लवकर यावर मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन शेतकऱ्यांना समाधान मिळवून देऊ, अशी भूमिका प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांना बोनस मिळवून देण्यासाठी आपली भूमिका मागील 40 वर्षांपासून कायम असल्याचं प्रफुल पटेलांनी सांगितलं. पूर्वी राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना कधीही बोनस मिळत नव्हता. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळं महाराष्ट्रात धानाला बोनस देण्याची प्रथा सुरू झाली, जी आजही चालू आहे. शासनाने यासंदर्भात दोनदा विधानसभेतही माहिती दिली असल्याचं त्यांनी नमूद केलं. प्रक्रियेत थोडा उशीर झाला म्हणून प्रत्येक गोष्टीवर सरसकट टीका करणे योग्य नाही. या विषयावर मागील आठवड्यात मुंबईत बैठक पार पडली असून, यात छगन भुजबळ आणि महायुतीचे सर्व आमदार व महायुतीच्या युतीच्या नेत्यांनी मिळून भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळं आणि त्यांच्या दुष्काळ दौरा आणि इतर प्रवासांमुळं लवकरच त्यांना प्रत्यक्ष भेटून या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असून त्यासाठी आम्ही बाद्य असल्याची भूमिका प्रफुल पटेल यांनी मांडली.
शेतकऱ्यांचं संकट आणि दुष्काळी परिस्थितीवर राजकारण नको
विरोधकांनी राज्यात असलेल्या दुष्काळ परिस्थितीवर दगडफेक न करता, कुठलेही राजकारण न करता एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्र सरकार सोबतच दुष्काळ भागातील नागरिकांसाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र याचा सामना करावा. विरोधकांकडून होत असलेला टीकेवर दुर्दैवी टीका असल्याची टीका प्रफुल पटेल यांनी करतानाच विरोधकांना एकत्र येण्याचा आवाहन केलं. राज्यातील सामान्य जनता, गोरगरीब आणि बळीराजाच्या कल्याणासाठी प्रार्थना करत असतो. यंदा महाराष्ट्रातील बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. शेतात पिकांची हानी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, तसेच पिण्याच्या पाण्याचा तुटवडा यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना सामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या सर्व संकटांतून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्यातील महायुती सरकार अतिशय चांगल्या आणि नियोजित पद्धतीने प्रयत्न करत आहे.
संकटाच्या या काळात विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वजण अत्यंत बारकाईने या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. महायुती सरकार सामान्य जनतेचे हे प्रश्न नक्कीच सोडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संकटाच्या या काळात विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप प्रफुल पटेल यांनी केला. एका बाजूला राज्य संकटाचा सामना करत असताना काही विरोधक विनाकारण मुद्दा नसताना केवळ दगडफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले. दुष्काळ आणि शेतकऱ्यांवरील संकट हा संवेदनशील विषय आहे. अशा वेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून, राजकारण न आणता सर्वांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना केला पाहिजे, अशी माझी प्रार्थना आहे, असे आवाहनही प्रफुल पटेल यांनी शेवटी केले.
मदतीवर राजकारण न करण्याचे प्रफुल पटेल यांचं आवाहन
राज्यात गंभीर दुष्काळाची परिस्थिती असताना सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जात आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी राजकारण करू नये, असे स्पष्ट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी केले आहे. दुष्काळ असल्याने सरकार किती तातडीने पावले उचलत आहे, हे स्पष्ट करताना प्रफुल पटेल म्हणाले की, दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाली आहे, जी शेतकरी, गरीब आणि सामान्य नागरिकांसाठीच आहे. आता तात्काळ प्राथमिक स्वरूपात सरकार प्रत्येक कुटुंबाला व शेतकऱ्यांना 5 हजार रुपये मदत देत आहे. ही एक चांगली गोष्ट असून तिचे स्वागत केले पाहिजे. सरकारने कुठेही असे म्हटले नाही की ही आमची पहिली आणि शेवटची मदत राहणार आहे. जशी-जशी परिस्थिती निर्माण होईल, तशी-तशी सरकार अनेक पावले उचलणार आहे. त्यामुळे अशा संकटाच्या काळात या विषयावर राजकारण करायचे नसते. सरकार हे सर्व नागरिकांचे असते, असे प्रफुल पटेल यांनी नमूद केले. सरकार आपल्याला साथ देत असताना, आपलीही सरकारला आणि सरकारच्या क्षमतेला व मर्यादांना साथ देण्याची भूमिका असली पाहिजे, असे सांगत त्यांनी सर्वांना एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करण्याचे आवाहन केले आहे.
