ठाणे : शहरातील प्रदीप पूर्णेकर (Pradip Purnekar) हत्याकांडानंतर ठाण्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचा मुद्दा समोर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज एकीकडे शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. दुसरीकडे ठाणेकरांनी (Thane) एकत्र येत भयमुक्त ठाणे मोर्चा काढला आहे. या मोर्चातही ठाणेकरांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. तर, यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात, स्वतः समोर आले तर एक एकाला घालवू, अशा शब्दात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्यातील काही नेत्यांवर हल्लाबोल केला.
ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा निष्पक्ष व पारदर्शक तपास व्हावा, या मागणीसाठी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव, काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे, शिवसेना ठाकरे गट ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष मनोज प्रधान उपस्थित होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी नेत्यांनी केली आहे.
आजचा दिवस ठाण्याचा काळ दिवस आहे, पोलीस प्रशासनाच्या विरोधात पहिल्यांदा मोर्चा झाला आहे. ठाण्यात काही विकलेले पत्रकार आहेत, भाईंनी पाणी पाजले, पुरातले आणले, खऱ्या खुऱ्या समस्येत तुम्ही नव्हते, बाळूची हत्या झाली, तेव्हा गुणगौरव सुरू होता, असे म्हणत मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. न्याय कोणाला मिळत नाही, मुंबईच्या बाजूला ठाण्यात इतके मोठे पोलिस प्रशासन आहे, पूर्णेकर कुटुंबाला छोटे समजू नका जश्यास तसे उत्तर देणारे कुटुंब आहे. तुम्ही चोरलेल्या पक्षाचे नेते आहात. मी कोणी आंडू पांडू भाईला घाबरत नाही, माझ्या मागे राजसाहेब आहेत. मला कधी भीती वाटते फिरायला, एकटा जाऊ नको घरचे सांगतात. यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात, स्वतः समोर आले तर एक एकाला घालवू, अशा शब्दात जाधव यांनी इशाराही दिला. सगळे एकत्र राहू हे ठाणे भयमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
कोळी बांधवांच्या उपस्थितीत मोर्चा
एकीकडे पोलिसांवर राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून संबंधित घटनेचा सखोल आणि जलदगतीने तपास करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे ठाण्यातील सर्वसामान्य नागरिकांनी पूर्णेकर कुटुंबीयांच्या समर्थनार्थ आणि ठाण्यातील गुन्हेगारीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मोर्चा काढला आहे. आगरी कोळी बांधवांच्या लक्षणीय उपस्थितीत हा मोर्चा निघाला आहे. बाळू दादाच्या न्यायासाठी वाट्टेल ते करू. ठाण्याचे बीड करून ठेवले आहे, गोळ्या मारल्या जाता, जीव जातो म्हणून चाकूने वार केले जातात. मीनाक्षी शिंदे हिला अटक होईपर्यंत भूमिपुत्र शांत बसणार नाही.कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न करा, भूमिपुत्र शांत बसणार नाही, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पालकमंत्र्यांनी प्रत्येकाच्या जीवाची हमी घ्यावी
आगरी कोळीचा ठाणे, आनंद दिघे, अनंत तरे ठाणे, भूमिपुत्रांना खपवायचे कंत्राट घेतले आहे का? सुपारी वाजण्याची सुपारी वाजण्याची वेळ आली आहे. माझ्या जीवाला धोका आहे. एक महिन्यापूर्वी मला मारण्याचा सत्ताधाऱ्यांनी प्लॅन केले, आणि आता तक्रारीसाठी येत आहेत, असे भिवंडीतील भूमिपुत्र शैलेश नरे यांनी म्हटले. तर, आपल्याला अपेक्षित असलेला तपास का होत नाही. तलावाचे, सुसंस्कृत ठाणे, विद्वान ठाणे खुनाचे ठाणे ओळखले जात आहे. याला कोणाचा वरदहस्त आहे. PSI हत्या होते, सर्वसामान्य ठाणेकरांचे काय? गोळ्या झाडल्या, मेले नाही म्हणून चॉपरने वार केले. नार्को टेस्ट करा ना. ठाणे ड्रग्समुक्त व्हावे, ठाण्याचा असा विश्वास नको, पालकमंत्र्यांनी प्रत्येकाच्या जीवांची हमी घेतली पाहिजे, तिकडे त्याचे कोणीच फिरकले नाही. पोलिसांना कोणाचा दबाव आहे का? खोपट मधील कोणाचा जीव जाणार आहे का? खोपट येथे क्लस्टर सर्वे सुरू आहे. रात्री 1 वाजता कोणता सर्वे सुरू आहे. क्लस्टर नावाखाली लोक मारण्याचे काम सुरू आहे का? रात्रभर, हुक्का, मसाज सुरू आहेत. आमच्यावर उपरे येऊन बसले तर आम्ही सहज करणार नाही. वाल्मिकीचा वाल्या होण्याचा वेळ आहे आहे. आगरी कोळी हातात कोयता घेण्याची वेळ आली आहे, असे महेश्वरी तरे यांनी म्हटले.
आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही
आरोपी 11 दिवस झाले लपून बसले आहेत, ठाण्याचे पालकमंत्री भयभीत झाले आहेत. म्हणजे कुठेतरी मनात पाप आहे. नरसंहार केला आहे. पण ठाणे भयभीत नाही. चौकशीसाठी मीनाक्षी शिंदे यांना का बोलावले जात नाही, मिडियासमोर पालकमंत्री का येत नाही, आगारांच्या वाघाला संपवले, आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत भिवंडीतील आगरी कोळी नेत्या दीपा चौधरी यांनी इशारा दिला.
