नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी  आज सोमवारी (२० जुलै) प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अधिवेशन अत्यंत ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासह (International Space Station) देशाने विविध क्षेत्रांत मिळवलेल्या यशाचा विशेष उल्लेख केला. तसेच, या अधिवेशनात केंद्र सरकार अनेक महत्त्वाची विधेयके मांडणार असून, त्यात 'वंदे मातरम'शी संबंधित विधेयकाचाही समावेश आहे.(PM Modi Parliament Monsoon Session 2026)

Continues below advertisement

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "माझा असा ठाम विश्वास आहे की, जिथे तथ्य (Facts) आणि तर्क (Logic) असतात, तिथे गोंधळ किंवा वादळाला काहीही वाव नसतो." "देशाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या सभागृहात अत्यंत अनुभवी खासदार आहेत. राजकीय पक्ष कोणताही असो, त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. अशा वेळी संसद आणि देश या दोघांनाही त्यांच्या या अनुभवाची आणि ज्ञानाची गरज आहे. म्हणूनच, संसदेचे कामकाज सुरळीत चालणे, अर्थपूर्ण चर्चा होणे आणि देशाला पुढे नेण्याचा सामूहिक संकल्प असणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे मला वाटते. आकांक्षांनी भरलेला देशातील तरुण वर्ग आपण पुढे जाण्याची मागणी करत आहे."(PM Modi Parliament Monsoon Session 2026)

PM Modi Parliament Monsoon Session 2026: "पाऊस आणि अधिवेशन दोन्ही प्रॉडक्टिव्ह राहो"

पंतप्रधान मोदी म्हणाले, "पाऊस असो वा संसदेचे पावसाळी अधिवेशन, दोन्ही जर प्रो-ॲक्टिव्ह असतील तर ते खूप प्रॉडक्टिव्ह (फलदायी) ठरतात; आणि जेव्हा दोन्ही प्रॉडक्टिव्ह ठरतात, तेव्हा देशाचे कल्याण होते, सर्व जीवमात्रांचे कल्याण होते. म्हणूनच आपण हीच प्रार्थना करतो की पाऊसही चांगला पडावा आणि पावसाळी अधिवेशनही तितकेच प्रॉडक्टिव्ह ठरावे."  ते पुढे म्हणाले, "गेल्या एका महिन्यात देशाने अनेक यश संपादन केले आहे. देशवासीयांचा अभिमान वाढेल अशा यशाची मालिकाच सुरू आहे. मग ते राष्ट्रीय क्षेत्र असो, आंतरराष्ट्रीय असो किंवा आता अंतराळ असो; सर्वच पातळ्यांवर भारतासाठी हे अभिमानास्पद क्षण ठरले आहेत."

Continues below advertisement

Parliament Monsoon Session 2026: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाबाबत (ISS) काय म्हणाले पंतप्रधान?

पंतप्रधान मोदी म्हणाले, "गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनापूर्वीच एक भारतीय नागरिक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचला होता आणि कालपरवाच भारताच्या एका तरुण स्टार्ट-अपने अत्यंत मोठे यश संपादन केले आहे. हा केवळ एक योगयोग नसून एक संदेश आहे. आपल्या देशातील तरुणांची क्षमता आणि त्यांची आकांक्षा अंतराळासारखी असीम आहे, हाच तो अत्यंत मजबूत संदेश आहे.""सुधारणांच्या एक्स्प्रेसवर (Reform Express) स्वार होऊन आज देश पुढे जात आहे. त्याचाच हा परिणाम आहे की भारतातील तरुण एवढे मोठे धाडस करू शकत आहेत आणि त्यात यशस्वीही होत आहेत," असेही त्यांनी स्पष्ट केले.

PM Modi Parliament Monsoon Session 2026: ग्रीन हायड्रोजन ट्रेन आणि सेमीकंडक्टर प्लांटचा उल्लेख

पंतप्रधानांनी देशातील महत्त्वाच्या विकासप्रकल्पांची माहिती देताना सांगितले, "नुकतीच राजस्थानमध्ये एक खूप मोठी 'ऑइल रिफायनरी' देशवासीयांच्या सेवेत समर्पित करण्यात आली. काही आठवड्यांपूर्वी देशातील तिसरा 'सेमीकंडक्टर प्लांट' राष्ट्राला समर्पित करण्यात आला. तसेच, काही दिवसांपूर्वी 'ग्रीन हायड्रोजन'वर चालणारी ट्रेनही देशाच्या सेवेत रुजू झाली आहे. जगात अशा सुविधा असणारे अतिशय मोजके देश आहेत, मात्र भारताने जी हायड्रोजन ट्रेन समर्पित केली आहे, ती सर्वात शक्तिशाली इंजिन असणारी आणि सर्वात लांब ट्रेन आहे."

PM Modi Parliament Monsoon Session 2026:  विरोधी पक्षांकडून विविध मुद्दे उचलण्याची शक्यता

दरम्यान, संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष अयोध्या राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरण आणि NEET-UG पेपर लीक प्रकरणासह अनेक मुद्दे उपस्थित करण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी NEET-UG २०२६ पेपर लीक प्रकरणावर चर्चा करण्यासाठी नियम २६७ अंतर्गत राज्यसभेत कामकाज स्थगितीची नोटीस आधीच दिली आहे. काँग्रेस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही नियम २६७ अंतर्गत 'अयोध्या राम मंदिरात दानाची चोरी' या विषयावर चर्चेची मागणी करणारी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI