Parth Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी गंभीर आरोप केलाय. पार्थ पवारांनी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 1800 कोटींच्या जमिनीच्या व्यवहारात मोठा गैरव्यवहार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या व्यवहारात पार्थ पवारांच्या कंपनीने फक्त 300 कोटींमध्ये जमीन विकत घेतल्याचा, तसेच केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क (स्टँप ड्युटी) भरल्याचा दावा दानवेंनी केला आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे डील 300 कोटीचे दाखवून, त्यावरचे 21 कोटी देखील माफ... ही माफी फुकट नव्हती का?, असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलाय. 

Continues below advertisement

अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की,  मेवाभाऊंच्या राज्यात... 1800 कोटींची जमीन, 300 कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये! उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं. 

Ambadas Danve on Parth Pawar: एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे शक्य होते?

गंमत तर पुढे आहे.. एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल! 

Continues below advertisement

Ambadas Danve on Parth Pawar:  अवघ्या 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ 

दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या 48 तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे 27 दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या 40 एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये 500! फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र, असे म्हणत अंबादास दानवे यांनी पार्थ पवारांवर गंभीर आरोप केलाय. 

Anjali Damania on Parth Pawar: अंजली दमानियांचीही टीका

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांना “सारखं फुकट, सारखं माफ लागतं” म्हणणारे अजित पवार पोराच्या 1804 कोटींचे डील. त्यावर 126 कोटींची स्टँप ड्यूटी होते , हे डील 300 कोटीचे दाखवून, त्यावरचे 21 कोटी देखील माफ...ही माफी फुकट नव्हती का?, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय.

आणखी वाचा

Parth Pawar Land: अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवारांवर जमिनीचा घोटाळा केल्याचा आरोप; विरोधक आक्रमक, पार्थ पवारांनी एकाच ओळीत दिलं उत्तर, म्हणाले...