मोठी बातमी : पालघरचे SP सगळ्यात भ्रष्ट, त्यांचा अव्वल नंबर कसा, 100 दिवसाच्या रिपोर्ट कार्डवर अंबादास दानवेंचा हल्ला
Maharashtra Govt 100 Days Report Card: स्वतः चं परीक्षा घ्यायची स्वतः चं मार्क द्यायचा कोणाला तरी पास करायचा कोणाला नापास करायचा काम सरकारने केलं आहे असं म्हणत त्यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.

Maharashtra Govt 100 Days Report Card: राज्यातील महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल काल (गुरूवारी 1 मे) (Maharashtra Govt 100 Days Report Card) रोजी जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री आदिती तटकरे यांचा महिला आणि बालविकास विभाग 80 टक्के गुणांसह सर्वोत्तम ठरला आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग दुसऱ्या तर कृषी विभाग तिसऱ्या स्थानी आहे. या 100 दिवसाच्या रिपोर्ट कार्डवरती शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हल्लाबोल केला आहे. स्वतः चं परीक्षा घ्यायची स्वतः चं मार्क द्यायचा कोणाला तरी पास करायचा कोणाला नापास करायचा काम सरकारने केलं आहे असं म्हणत त्यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. तर पालघरचे SP सगळ्यात भ्रष्ट, त्यांचा अव्वल नंबर कसा दिला असा सवालही दानवेंनी यावेळी उपस्थित केला आहे.
काय म्हणालेत अंबादास दानवे?
काल महाराष्ट्र दिन होता आणि महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने महत्वाचा दिवस होता. काल राज्याच्या मुख्यमंत्री यांनी प्रगती पुस्तक जाहीर केलं. स्वतः चं परीक्षा घ्यायची स्वतः चं मार्क द्यायचा कोणाला तरी पास करायचा कोणाला नापास करायचा काम सरकारने केलं आहे. एप्रिल महिन्यात सुद्धा मार्क्स दिले होते, त्यात एक महिन्यात असा काय बदल झाला हे कळत नाही. पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना पहिला क्रमांक दिला, हे तेच पोलीस अधीक्षक ज्यांनी गद्दारी करताना आमदार लोकांना गुजरातला जाण्यास मदत केली. गुटखा ड्रग्स जे गुजरातवरून येते त्यावर काहीच कारवाई केली नाही आणि त्यांना एक क्रमांक दिला आहे, असं म्हणत दानवेंनी सरकारला धारेवर धरलं आहे.
1 रुपया पीक विमा योजना बंद केली
पुढे बोलताना ते म्हणाले, परिवहन विभाग 5 व्या नंबरला आहे. त्यात 50 टक्के ऐवजी 40 टक्के पगार वाढ एसटी कर्मचारी यांना दिली. कृषी विभागाला टॉप 5 मध्ये स्थान दिलं आहे. 1 रुपया पीक विमा योजना बंद केली. ही योजना भ्रष्टाचार झाला म्हणून बंद केली. फक्त मराठवाड्यात 289 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गृह विभागाबद्दल सांगायची गरज नाही. बीड घटना, परभणी घटना, स्वारगेट घटना, सैफ आली हल्ला, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढल्याची सुद्धा घटना घडली. मागच्या वर्षीच्या तुलनेत 32 टक्के राज्यात आत्महत्येचा प्रमाण 1 मे पर्यत वाढलेलं पाहायला मिळतंय. महिला बालविकास विभागमध्ये लाडकी बहीण योजनेतून 8 लाख महिलांना गाळलेलं पाहायला मिळतंय. 2100 रुपये लाडक्या बहिणीला देणार होतो, ते दिले नाहीत. पाणी टंचाई आहे, जलजीवन मिशन योजना फेल झाली, हे स्वतः राज्याचे मंत्री म्हणतात. वेदिका चव्हाण या मुलीचा मृत्यू पाणी टंचाईमुळे झाला. व्हिजन महाराष्ट्र कार्यक्रम राबविला जाणार होता, तो राबविला नाही. मंत्र्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे जयकुमार, रावल माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप झालेले आहेत असंही पुढे दानवेंनी म्हटलं आहे.
तुमच्या सरकाराची औकात काय हे जनतेतून कळेल
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, गुणांक दिले म्हणजे महत्वाच्या विषयावरून लक्ष हटविण्याचा काम सरकार करत आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेला हे गुणांक फसवं आहे. जनतेला आता या गुणांकाबद्दल विचारावं. तुमच्या सरकाराची औकात काय आहे हे तुम्हाला जनतेतून कळेल, अदिती तटकरे यांचं डिसेंबरमध्ये केलेलं वक्तव्य होतं. मार्चमध्ये 2100 रुपये लाडक्या बहिणीला देऊ. आता कधी देणार 2100?राज्य आर्थिक स्थितीत योग्य वळणावर नाही त्यामुळे हे सगळं होतंय, असा खोचक टोला देखील दानवेंनी लगावला आहे.
पालघर एसपी सगळ्यात भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. गुटखा ड्रग्स गुजरातमधून जे आपल्या राज्यात येतं. ते पालघरमधून राज्यात जातं हे त्यांच्या आशीर्वादाने जात. कुठलेही कारवाई होत नाही. त्यांना पहिला क्रमांक दिला आहे. शेतकरी सन्मान निधी वाढविण्याचा आश्वासन दिलं होतं. अंगणवाडी आणि आशा सेविका यांचं वेतन वाढवलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्यावर कठोर कारवाई सरकारकडून करण्यात आलेली नाही. जनतेकडून तुम्ही गुणांक घ्या, तेव्हा तुम्हाला खरे गुणांक कळतील ते तुम्हाला खरे गुण देतील, असंही पुढे अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.
























