मुंबई : काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgaum) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यामध्ये, महाराष्ट्रातील देखील काही पर्यटकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य, आप्तेष्ट, जवळचे नातेवाईक गमावले होते. त्यामध्ये, पुण्यातील संतोष जगदाळे यांचाही या भ्याड हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्य सरकारने महाराष्ट्रातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकर देण्याची घोषणा केली. मात्र, जवळपास 1 वर्षे होत आले असतानाही त्यांना नोकरी मिळत नसल्याचे समोर आले. खासदार सुप्रिया सुळेंनी याबाबत ट्विट करत शासनाचे लक्ष वेधले होते. एबीपी माझाने याचे वृत्त दाखवल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आसावरी जगदाळेंना शासकीय नोकरी देऊ केली आहे.
पुण्यातील संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्तांना दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील जगदाळे कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे आणि आसावरी जगदाळे यांचे सांत्वन करून या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी आसावरीला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी आसावरी हिला बोलवून तिच्याशी बोलून तिच्या शिक्षणाला समकक्ष असे पद महानगरपालिकेत निर्माण करून तिला सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले. तसेच शासन सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेत असून विशेष बाब म्हणून तिच्या नेमणुकीला मंजुरी देण्यात येईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, जगदाळे कुटुंबीयांना मुलीच्या नोकरीचा आधार मिळणार आहे.
विद्यापीठातील नोकरीस नकार
दरम्यान, आसावरी जगदाळे यांच्या नोकरी प्रकरणी सरकारी स्तरावर हालचाली सुरू होत्या. सरकारी प्रक्रियेत वेळ लागू नये, म्हणून एका खासगी विद्यापीठाचा पर्याय त्यांना देण्यात आला होता. मुख्यमंत्री स्वत: त्याबाबत संबधित विद्यापीठाशी बोलले. पण, त्याला जगदळे कुटुंबाने नकार दिला. त्यानंतर पीएमआरडीएमध्ये नोकरीचा प्रस्ताव दिला, पण त्यांची इच्छा पुणे महापालिका होती. पुणे महापालिकेने वर्ग-3 किंवा वर्ग-4 ची नोकरी त्यांच्या स्तरावर देता येते. मात्र, विशेष बाब म्हणून वर्ग-2 ची नोकरी देण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला, त्यावर कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, 26 नोव्हेर 2008 रोजी मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतंकवाद्यांशी प्रतिकार करत असताना प्रकाश पांडुरंग मोरे पोलिस उपनिरीक्षक यांना वीरमरण आले. त्यांची मुलगी श्रीमती अनुष्का मोरे यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात आली होती.