बीड : विधानसभेनंतर आता लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडेंना (Pankaja munde) पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, विधानसभेपेक्षा लोकसभा निवडणुकीतील त्यांचा पराभव मुंडे समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच, गेल्या 10 दिवसांपासून बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून काही ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. तर, दोन युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यापैकी, बीड (Beed) जिल्ह्याच्या आष्टी तालुक्याती युवक पोपट वायभासे यानेही आपले जीवन संपवले होते. पंकजा मुंडेंनी दिल्ली दौऱ्यानंतर आज बीडमध्ये येताच, वायभासे कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीवेळी पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंनाही अश्रू अनावर झाले होते. 


पंकजा मुंडेंनी पोपट यांच्या पत्नी व मुलांचे सांत्वन केले, त्यावेळी पंकजा मुंडेंना धाय मोकलून रडताना पाहून सर्वच भावूक झाले होते. कुटुंबीयांनी टाहो फोडताच, उपस्थितांचेही डोळे पाणावले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलतानाही पंकजांचा कंठ दाटला होता. त्यावेळी, पंकजा यांनी सर्वच कार्यकर्ते आणि समर्थकांना उद्देशून आवाहन केलं आहे. ''मी मुंडेसाहेबांनतर समाजाला आणि कार्यकर्त्यांना कुटुंबापेक्षाही जास्त जीव लावला. लोकांनीही मला एवढा जीव लावला की, माझ्या पराभवानंतर ते जीव देत आहेत, पण हे मला मान्य नाही. मी स्वतःचं संतुलन कधीही स्वतःचे संतुलन बिघडू दिल नाही. मी कधीही भूमिका कमकुवत घेतली नाही. पण, या आत्महत्येच्या घटनांमुळे मी कमकुवत झाली आहे. मला खूप अपराधी वाटत आहे. कारण, माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला मी काहीच देऊ शकत नाही,'' अशा शब्दात पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


अशी परिस्थिती निर्माण करु नका


''जय-पराजय अनेक झाले, मुंडेसाहेबांचा पराभव झाला, विलासराव देशमुख साहेबांचाही झाला. पण, पराभव एवढे जिव्हारी लागण्याचं कारण ही आत्ताची परिस्थिती आहे. माणसाला स्वतःच्या नजरेत इतकं लहान करू नका, आणि त्यांचा जीव ज्या नेत्यांमध्ये आहे त्यांनाही करू नका, त्यांना स्वतःचे जीव द्यावे लागतील अशी परिस्थिती निर्माण करू नका, अशी माझी विनंती आहे.'', असे पंकजा यांनी म्हटले.  



नाहीतर मी राजकारण सोडेन


''मला वाटतं की इतकं प्रेम कोणत्याच नेत्यावर कोणी करू नये की, त्यांनी त्याच्यासाठी स्वतःचा जीव द्यावा. जर तुम्हाला हिंमतीने लढणारा नेता हवाय तर मला सुद्धा हिंमतीने लढणारा कार्यकर्ता हवा आहे. नाहीतर मी राजकारण सोडून देईन, अजून जर कोणी जीव दिला तर. कारण, राजकारणामुळे हे होतंय असं मला वाटतं, असे म्हणत पंकजा मुंडेंनी समर्थकांना आवाहन केलं आहे. मी सगळ्यांच्या पाया पडून सांगते काही करा पण स्वतःचा जीव देऊ नका,'' असेही त्यांनी म्हटले. 


100 दिवस माझ्यासाठी द्या


पराभवाने विजयाने मी हरणारी नाही, पण अशा गोष्टी मला हादरवून टाकतात. हे प्रसंग पाहून मी स्वतः खूप अस्वस्थ आहे. आत्महत्या करायला खूप हिंमत लागते, तुम्ही ती हिंमत पुढचे शंभर दिवस माझ्यासाठी द्या, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू, असेही पंकजा मुंडेंनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले.