Operation Tiger UBT Shivsena: ठाकरेंच्या सहा खासदारांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला? शिवसेनेच्या वर्धापनदिनीच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देणार
Operation Tiger UBT Shivsena: गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे 19 जूनला शिवसेनेचा मेळावा वर्धापन दिन, 60 वा वर्धापन दिन, यावेळी खासदार ठाकरे गटात प्रवेश करणार

Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात आले असून दिल्लीत सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. हे सर्व खासदार दिल्लीत दाखल झाले असून बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून ते शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे पत्र देतील, अशी शक्यता आहे. मात्र, या सहा खासदारांचा पक्षप्रवेश आज नव्हे तर 19 जून रोजी मुंबईतील शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात पार पडेल, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जून रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर पार पडत आहे. हा मेळावा भव्यदिव्य करण्यासाठी सध्या शिंदेंच्या गोटात जोरदार तयारी सुरु आहे. याच वर्धापनदिन मेळाव्यात ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अधिकृतरित्या प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त गाठीभेटी सुरु होत्या. मात्र, या खासदारांच्या गटाला अधिकृतरित्या मान्यता मिळण्यासाठी ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी बाहेर पडणे आवश्यक होते. या अटीची पूर्तता झाल्यानंतरच एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातील फुटीर खासदार दिल्लीला गेल्याची माहिती आहे. या बंडखोर खासदारांच्या गटाला केंद्रातील एक मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तत्पूर्वी आपले सहा खासदार फुटणार हे स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन शिंदे गटावर टीका केली होती. फुटीर खासदारांना 15 कोटी रुपयांचा अॅडव्हान्स देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना पत्र पाठवून फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता देऊ नये, अशी मागणीचे पत्र पाठवले होते. यावर आता लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.
Shivsena news: ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
Shivsena MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
शिंदेना पाठिंबा देणाऱ्या सहाव्या खासदाराचे नेमकं नाव समोर आलं नाही.
आणखी वाचा
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा























