Operation Tiger UBT Shivsena: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेत असलेले ऑपरेशन टायगर अखेर प्रत्यक्षात येताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार हे अखेर एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले असून त्यांनी उद्धव ठाकरे ( यांची साथ सोडण्याचे निश्चित केल्याची माहिती आहे. ठाकरे गटाचे हे सहा खासदार बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना पत्र देऊन आपण ठाकरे गट सोडला असून आता आपला पाठिंबा शिंदे गटाला असेल, असे स्पष्ट करतील. त्यासाठी ठाकरे गटाचे काही फुटीर खासदार आणि एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे. फुटीर खासदारांच्या या गटाला एक केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics news)
गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंचे खासदार हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होते. अधुनमधून हे खासदार एकनाथ शिंदे यांना गुप्तपणे भेटतही होते. मात्र, ठाकरे गट सोडण्याचा त्यांचा निर्णय अंतिम होत नव्हता. मात्र, गेल्या आठवडाभरात यासंदर्भातील हालचालींना वेग आला होता. हे खासदार एकनाथ शिंदेंसोबत जाणार हे लक्षात आल्यानंतर ठाकरे गटाने हालचाली सुरु केल्या होत्या. या खासदारांची मनधरणी करण्यासाठी मातोश्रीवरुन प्रयत्न सुरु होते. काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, या बैठकीला फक्त पाच खासदारच पोहोचले होते. उर्वरित खासदार ऑनलाईन पद्धतीने बैठकीला हजर होते, असे सांगितले जाते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिंदे गटात जाण्याच्या चर्चांविषयी सांगितले. त्यावेळी अनेक खासदारांनी आई तुळजाभवानी, साईबाबा आणि आपल्या मुलांची शपथ घेऊन आपण कुठेच जाणार नसल्याचा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला होता. मात्र, गेल्या काही तासांमधील घडामोडी पाहता आईबाबा, साईबाबा या सगळ्यांच्या शपथा फेल ठरल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना सोबत ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या सर्व खासदारांना अपेक्षित गोष्टी देऊन आपल्या बाजूला वळवण्यात आणि त्यांची मनधरणी करण्यात यश मिळवल्याचे दिसत आहे.
ठाकरे गटाने आपले खासदार फुटणार हे कळाल्यानंतर संबंधित मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मातोश्रीवर बोलावून घेतले होते. जेणेकरुन खासदार गेले तरी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्यासोबत राहतील, असा प्रयत्न होता. या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी खासदारांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवून फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता देऊ नये, अशी भूमिका मांडली. मात्र, एकनाथ शिंदे यांना या सगळ्याची आधीपासूनच कल्पना होती. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मंगळवारी रात्री दिल्लीला जाण्यासाठी निघाले, ते दिल्लीला न जाता राजस्थानला पोहोचले. याठिकाणी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे हे विमानाने पुन्हा दिल्लीत आले. अशाप्रकारे एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची खात्री केली आहे.
ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख आणि संजय जाधव, संजय दिना पाटील हे खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. ठाकरे गटातही जोरदार हालचाली सुरू असून अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंत हे संकटमोचकांच्या भूमिकेत सक्रिय झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांदा शिवसेनेत मोठी फूट पाडून दाखवली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचे राज्यात आणि केंद्राच्या राजकारणातील वजन आणि दबदबा वाढणार आहे. भाजपप्रमाणे आपणही आपल्या नेतृत्त्वाच्या जोरावर विरोधी पक्षातील मोठा गट फोडू शकतो, असले राजकारण आपल्यालाही जमते, हे एकनाथ शिंदे यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. मात्र, या सगळ्यामुळे ठाकरे गटाची अवस्था बिकट होणार आहे. ठाकरे गटाचे राज्यातील अस्तित्त्व कितपत उरणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Operation Tiger UBT Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन
उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र दिले. लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजूरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली आहे. त्यानंतर हा गट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत विलीन होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Shivsena MPs: ठाकरेंच्या सहा खासदारांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जून रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर पार पडत आहे. हा मेळावा भव्यदिव्य करण्यासाठी सध्या शिंदेंच्या गोटात जोरदार तयारी सुरु आहे. याच वर्धापनदिन मेळाव्यात ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अधिकृतरित्या प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे
Omraje Nimbalkar in Delhi : ओमराजे निंबाळकर दिल्लीत दाखल
ओमराजे निंबाळकर आणि इतर नेत्यांना दिल्लीला नेण्यासाठी पुणे विमानतळावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने २ खाजगी विमाने (Private Jets) पुणे विमानतळावर सज्ज ठेवण्यात आली होती. काल रात्री 1 वाजता विमानाने ओमराजे निंबाळकर दिल्लीत दाखल झाले आहेत.
Uddhav Thackeray: सहा खासदार फुटताच उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल
ठाकरे गटाने खासदारांनी फुटून स्वतंत्र गट स्थापन केल्यास काय करायचे, यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेतला आहे. त्यानुसार ठाकरे गट या फुटीर खासदारांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्याच्या तयारीत आहे. ठाकरे गटाकडून संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. Shivsena news: एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ एका आश्वासनावर 6 खासदार उद्धव ठाकरेंना सोडायला तयार झाले एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरे गटाच्या खासदारांना अनेक मोठी आश्वासनं देण्यात आली आहेत. यापैकी खासदार संजय जाधव यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचे आणि मतदारसंघातील विकासकामांसाठी मुबलक निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना त्यांच्या मतदरासंघातील प्रकल्प मार्गी लावण्याचे आणि विकासकामांसाठी मुबलक निधीचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तर एका खासदाराला त्याच्या भावाचे बँकेतील घोटाळ्याचे प्रकरण बाहेर काढून त्याला शिंदे गटात प्रवेश करायला भाग पाडल्याची माहिती आहे. तर दोन खासदारांना आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आपल्याला भविष्य उरलेले नाही, असे वाटल्याने हे दोन्ही खासदार शिंदेंसोबत जायला राजी झाल्याची माहिती आहे. या सगळ्यांना आगामी काळात मुबलक निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी या सर्व सहा खासदारांना 2029 च्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला निवडून आणेन, असा शब्द दिल्याने हे खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला तयार झाल्याचे समजते.
Sanjay Raut: संजय राऊतांची खासदारांवर टीका
रात्री 11 वाजण्याच्या सुमारास खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे या बातम्या काही प्रमाणात खऱ्या असल्याचं दिसून आलं. संजय राऊत यांनी सोशल मिडीयावर, "अपना सपना मनी..मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा अॅडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!", असे ट्विट संजय राऊत यांनी केले.
ऑपरेशन टायगर सोपं नाही. आमच्यापर्यंत अशाप्रकारच्या कोणत्याही घडामोडींची अधिकृत माहिती नाही. आम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहतोय, ऐकतोय. काल रात्री मला 11.30 वाजता एका व्यक्तीने सांगितलं महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जातंय. मी म्हटलं भाव काय आहे? ते म्हणाले, भाव तोच आहे, ५०-५० कोटी
Shivsena Meeting in Mumbai: मातोश्रीवरच्या बैठकीत एका खासदाराने चारवेळा साईबाबांची शपथ घेतली: संजय राऊत
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मातोश्रीवर 14 जूनला झालेल्या बैठकीचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, 14 तारखेच्या बैठकीला लोकसभेचे चार खासदार बैठकीला उपस्थित होते. यामध्ये अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि संजय दिना पाटील उपस्थित होते. उर्वरित पाच जण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला हजर होते. त्यांनी उद्धव ठाकरेंना आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले. एका खासदाराने चारवेळा साईबाबांची शपथ घेतली. मी तुमच्यासोबत आहे, साईबाबांची शपथ घेतो; माझी बायको आजारी आहे, साईबाबांची शपथ घेतो, मी दोन दिवसांत भेटायला येतो, साईबाबांची शपथ घेतो, मी मरेपर्यंत तुमच्यासोबत राहतो, साईबाबांची शपथ घेतो, असे या खासदाराने म्हटले. एकाने त्याच्या मुलीची तर आणखी एकाने आई भवानीची शपथ घेतली. अशा शपथा घेतल्यावर विश्वास ठेवणे अनिवार्य होते, असे संजय राऊत यांनी म्हटले.
Maharashtra Politics news: ठाकरे गटाचे खासदार ?
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
Shivsena MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर? 1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे 6. संजय दिना पाटील
आणखी वाचा
