Operation Tiger Rajabhau Waje Shivsena UBT: दिल्लीतील नाट्यमय घडामोडी आणि 'ऑपरेशन टायगर'च्या (Operation Tiger) राजकीय भूकंपानंतर नाशिकचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) हे पहिल्यांदाच नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले. दिल्लीत ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले असताना, 100 कोटींच्या विकासकामांची ऑफर आणि प्रलोभने धुडकावून राजाभाऊ वाजे उद्धव ठाकरेशी एकनिष्ठ राहिले. या राजकीय घडामोडींनंतर नाशिकरोड रेल्वे स्थानकावर (Nashik Road Railway Station) शिवसैनिकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. मात्र, या ऐतिहासिक स्वागतानंतर जेव्हा राजाभाऊ आपल्या निवासस्थानी पोहोचले, तेव्हा तिथे अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावूक क्षण पाहायला मिळाला.
Operation Tiger Rajabhau Waje Shivsena UBT: वडिलांनी पाठीवर मारली थाप; राजाभाऊंना अश्रू अनावर
खासदार राजाभाऊ वाजे रेल्वे स्थानकावरून थेट आपल्या निवासस्थानी पोहोचले. घरात पाऊल ठेवताच त्यांनी आपले वडील प्रकाश वाजे यांचे पाया पडून दर्शन घेतले. यावेळी वडिलांनी अत्यंत अभिमानाने आपल्या निष्ठावंत लेकाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि त्यांना प्रेमाने जवळ घेतले. बापाने पाठीवर मारलेली ही थाप आणि दिलेली प्रेमाची पावती पाहून गेल्या काही दिवसांपासून राजकीय दबावाचा सामना करणाऱ्या राजाभाऊ वाजे यांना आपल्या भावना अनावर झाल्या. वडिलांच्या कुशीत जाताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वाजे पित्या-पुत्राच्या या अत्यंत भावनिक भेटीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Operation Tiger Rajabhau Waje Shivsena UBT: वाजे कुटुंबाने मोडली बंडखोरांची मनधरणी
या संपूर्ण फोडाफोडीच्या राजकारणात राजाभाऊ वाजे यांना गळाला लावण्यासाठी शिंदे गटाकडून अतोनात प्रयत्न झाले होते. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आरोप केला होता की, प्रत्येक खासदाराला 15 कोटींचे टोकन आणि 100 कोटींच्या विकासकामांची ऑफर दिली जात होती. 14 एप्रिल रोजी शिंदे गटाचे दोन पदाधिकारी राजाभाऊंच्या सिन्नर येथील निवासस्थानी गेले होते. त्यांनी राजाभाऊंचे वडील प्रकाश वाजे यांची दोन ते अडीच तास मनधरणी केली होती. मात्र, वाजे कुटुंबाने या कोट्यवधींच्या ऑफर्सना भीक न घालता पक्षांतरास स्पष्ट नकार दिला आणि ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला.
Operation Tiger Rajabhau Waje Shivsena UBT: भर पत्रकार परिषदेतही झाले होते भावूक
यापूर्वी दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेतही राजाभाऊ वाजे भावूक झाले होते. जेव्हा संजय राऊत हे शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचे नाते पोटतिडकीने सांगत राजाभाऊंच्या निष्ठेचे कौतुक करत होते, तेव्हा पक्षावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे राजाभाऊंना कॅमेऱ्यासमोरच अश्रू अनावर झाले होते.
Operation Tiger Rajabhau Waje Shivsena UBT: नाशिकमध्ये पाऊल ठेवताच राजाभाऊंची प्रतिक्रिया
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की, "ज्या विचारधारेतून मी निवडून आलो त्या विचारधारेशी मी प्रामाणिक आहे. ही समाधानाची भावना आहे. मी जो निर्णय घेतला तो योग्य आहे ही त्याची पावती आहे. मी प्रामाणिकपणे माझं काम करत आहे. कार्यकर्त्यांचं प्रेम होतंच परंतु ते वाढले आहे. मला ऑफर मिळाली नव्हती, मला पाहिजे ते मला मिळत आहे आणि ते माझ्यासाठी खूप आहे," असे त्यांनी म्हटले.
तर, "मी कुठेही जाणार नाही. सध्याच्या परिस्थितीमधून शिवसेना बाहेर पडेल. माझे आज स्वागत झाले, तो माझा दुसरा विजय आहे. वर्धापनदिनाच्या दिवशी दोन शिवसेना वर्धापनदिन साजरा करतात त्याचे दुःख आहे. मी शिवसेना एक असताना आमदार होतो. आता दोन शिवसेना असताना खासदार आहे, " अशी देखील प्रतिक्रिया राजाभाऊ वाजे यांनी दिली.
आणखी वाचा
