पुणे : गणेशोत्सवाची (Ganeshotsav) मोठी तयारी सर्वत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशातच यंदाही पुण्यातील गणेशोत्सवाच्या अनुषंगाने डीजे, ध्वनीक्षेपक आणि लेझर लाईट, धांगडधिंगा हा प्रश्न प्रामुख्याने समोर आला आहे. पुण्यातील (Pune) नागरिक विद्यानंद बापट यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर, त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून आता गणेशोत्सवात डीजे बंदी आणि ध्वनी प्रदुषणाविरुद्ध मोहीम सुरू झाल्याचं दिसून येत आहे. अनेक जण गणेशोत्सव डीजे वापरावर बंदी घालावी अशी मागणी करत आहेत, तर काहींनी डीजेच समर्थन देखील केलं आहे, यासंदर्भात भाजप नेते आणि मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी एबीपी माझाच्या 'माझा इन्फ्रा व्हिजन' कार्यक्रमात बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Continues below advertisement

उत्सव आणि डीजेसंदर्भात फक्त हिंदू सणांच्यावेळी आक्षेप का घेतला जातो. गेल्या आठवड्यात ईद झाली. साडेबारा, दोन वाजेपर्यंत डीजे वाजवत होते. मग सगळेच सल्ले, मार्गदर्शन हिंदू सणांनाच कशाला, आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी पुण्यात भूमिका घेतली, सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा. चांगली गोष्ट आहे. पुण्यात तशी भूमिका डीजेविषयी घ्यावी. कारण डीजेचा त्रास सर्वांनाच होतो. मग हिंदूंना ईदच्यावेळी डीजेचा त्रास होत नाही का, ते डीजेचे प्रकार वेगळे असतात का, आम्हालाही ती टेक्नॉलॉजी समजवा. रात्री धिंगाणे घातले जातात. त्यांनाही डीजे वाजवू नका सांगा. हा खरं म्हणजे संस्कार आणि धर्माचा विषय आहे. आमच्या भगवदगीतेत ज्या काही गोष्टी लिहलेल्या आहेत, सनातन हिंदू धर्म हा एक आदर्श धर्म आहे. मग इस्लाम धर्माने मार्गदर्शन आणि प्रेरणा भगवदगीतेपासून घ्यावी, हा आमचा सल्ला आहे, असंही  नितेश राणेंनी म्हटलं आहे.

तर आम्ही हिंदू म्हणून सगळे नियम पाळतो. न्यायालयाने घालून दिलेल्या 10 वाजेपर्यंत स्पीकर वाजवण्याच्या मर्यादेचे पालन करतो, नियम तोडत नाही. कुठल्याही हिंदूने ईद किंवा मोहरमच्या जुलूसमध्ये चप्पल मारली, असे एक उदाहरण मला द्यावे. पण सगळ्याच चपला, दगड मारण्याचे प्रकार हिंदू सणांच्यावेळी का होतात. काही लोकांच्या मते भाईचारा, सर्वधर्मसमभाव आहे ना, मग  भाईचाऱ्याचा सर्व ठेका हिंदूंनीच घेऊन ठेवला आहे का? असा सवालही यावेळी बोलताना नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

Continues below advertisement

Pune DJ: पुण्यात डीजेला विरोध

पुण्यातील विद्यानंद बापट यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत.  पुणे महापालिकेच्या गणेशोत्सवपूर्व बैठकीत विद्याधर बापट यांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला विरोध केला. विद्याधर बापट यांनी गणेशोत्सवाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, उत्सव साजरा करताना इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी भूमिका मांडली. गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुका, लाऊडस्पीकर आणि डीजेमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा नागरिकांवर होणारा परिणाम विद्याधर बापट यांनी बैठकीत मांडला. मुख्य रस्ते बंद करून मोठ्या मिरवणुका काढल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो, त्यामुळे उत्सवाच्या पद्धतीत कालसुसंगत बदल करण्याची गरज असल्याचेही विद्यानंद बापट यांनी सांगितले. तसेच विद्यानंद बापट यांच्या अस्खलित मराठीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.