धाराशिव: भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. एक मंत्रि‍पदावर असलेल्या व्यक्तीकडून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही बोलले जात होते. तर, यापूर्वी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दाखला देत नितेश राणे यांनी थेट पोलिसांनाच दम भरला होता. आता, धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात भाजपच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणेंनी थेट शिवसेनेला इशारा दिलाय. धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील कामांना स्थगितीच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणेंनी (Nitesh Rane) वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकीच त्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना दिली आहे. कुणी कितीही ताकद दाखवली , कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.  

Continues below advertisement


धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना गर्भित इशारा दिला. कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असा दमच नितेश राणेंनी दिला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असले तरी धाराशिवच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाहीत. म्हणूनच, जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती मिळाल्याचं राणेंनी म्हटलं. धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजप आणि शिवसेनेत सुप्त संघर्ष आहे. शिवसेने नेते असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आली आहे. त्याच, अनुषंगाने भाजपच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणेंनी शिवसेना नेत्यांना थेट इशाराच दिलाय.


ठाकरेंच्या एकत्र येण्याची उडवली खिल्ली


उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर भाष्य करताना मंत्री नितेश राणेंनी तुळजापुरात ठाकरेंची खिल्ली उडवली. ते एकत्र येणार असल्याच्या चर्चेने आम्हाला झोप लागत नाही, एकाकडे 20 आमदार आणि एकाकडे शून्य यांची एवढी शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत, आम्हाला घाम फुटला आहे अशा शब्दात नितेश राणेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची खिल्ली उडवली. तसेच हिंदुत्त्व सोडल्यामुळेच ठाकरे ब्रँड बुडाल्याचा टोला नितेश राणे यांनी ठाकरेंना लगावला. नितेश राणे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते, त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. 


हेही वाचा


Amol Mitkari: ... तर आषाढी एकादशीपर्यंतही बहीण-भाऊ एकत्र येऊ शकतात, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट