Nirmala Nawale Shirur Panchayat Samiti Election Result 2026: सोशल मिडीयावर प्रचंड फॅन फॉलोअिंग असणाऱ्या शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले (Nirmala Nawale )यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर पंचायत समितीच्या (Shirur Panchayat Samiti) कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून निवडणुकीला उभ्या होत्या. निर्मला नवले या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. आजवर त्यांचे अनेक रिल्स आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. निर्मला नवले यांची स्टाईल आणि त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचे व कृतीचे त्यांच्या चाहत्यांना अप्रूप असते. त्यामुळे त्यांच्या रिल्स सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतात. मात्र, यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांची जादू चालू शकली नाही. भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी निर्मला नवले यांना 300 मतांनी पराभूत केले. हा निर्मला नवले आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

 पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. निर्मला नवले या राजकारणी असल्या तरी इन्स्टाग्रामवर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. निर्मला नवले यांनी आयटी इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केले आहे. काही वर्षांपूर्वी निर्मला नवले यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. तेव्हापासून त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली. उच्चशिक्षित आणि लोकप्रिय चेहरा म्हणून निर्मला नवले या कायम चर्चेत असायच्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत निर्मला नवले यांची जादू चालू शकली नाही.

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण 299 जागांपैकी 73 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपचे 20, शिवसेनेचे 7, राष्ट्रवादी काँग्रेसचे 27, ठाकरे गटाचे 2 आणि शरद पवार गटाचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार पूर्णपणे थंडावला होता. पुण्यात एकही मोठी सभा झाली नव्हती. अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळताना दिसत आहे.

आणखी वाचा

भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?