श्रीगोंदा: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि खासदार निलेश लंके आपल्या कामामुळे कायमच चर्चेत असतात. मात्र आता निलेश लंके हे वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. ते म्हणजे आढळगाव (ता. श्रीगोंदे) शिवारात 548 डी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून खासदार निलेश लंके काल (गुरुवारी) आक्रमक झाल्याचे दिसून आले आणि त्यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकार्याच्या कानशिलात लगावल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळासह सर्वत्र खळबळ उडाली. या चर्चांवरती मात्र, खासदार निलेश लंके आणि विभागाचे अधिकारी दोघांनीही नकार देत 'ध'चा 'मा' करण्यात आला असल्याचं म्हटलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याचं काम रखडल्यामुळं सुभान तांबोळी यांनी आढळगाव या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर काल (गुरुवारी ता.15) खासदार निलेश लंके त्यांची भेट घेऊन उपोषणाला बसण्यासाठी तेथे गेले होते. त्या वेळी वारंवार आंदोलने व उपोषण करूनही काम पूर्ण होत नसल्याच्या कारणाने खासदार लंके संतप्त झाले. लंके यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता व निखील कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीच्या अधिकार्याला जाब विचारला. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांना या रस्त्यावर प्राण गमवावे लागल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.
लंकेंनी उपअभियंता व ठेकेदाराच्या कानशिलात लगावल्याची चर्चा
श्रीगोंदा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548चे आढळगाव शिवारातील काम रखडल्यामुळे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी पोहोचलेल्या खासदार नीलेश लंके यांनी कामाबाबत संताप व्यक्त केला. त्याचबरोबर उपअभियंता व ठेकेदाराच्या कानशिलात लगावल्याची जोरदार चर्चा आहे. आढळगाव गावठाण हद्दीमधील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडलं आहे. हे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुभान तांबोळी आणि ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे. काल (गुरुवारी) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खासदार नीलेश लंके यांनी आंदोलनास्थळी भेट दिली. त्यावेळी काम का रखडले? असा प्रश्न करत त्यांनी अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यावेळी संताप अनावर झाल्याने त्यांनी उपअभियंता व ठेकेदार कंपनीच्या कामगाराच्या कानशिलात लगावली असल्याची चर्चा आहे.
रस्त्याचे काम रखडल्याने अधिकारी, ठेकेदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी लंके अधिकारी व ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना श्रीगोंदा पोलिस ठाण्यात घेऊन आले. ठेकेदार कंपनीच्या गलथान कारभारामुळे अनेकांचा जीव गेल्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी रात्री आठपर्यंत ते पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसल्याची माहिती आहे. दरम्यान, खासदार निलेश लंके यांनी या कंपनीच्या अधिकार्याच्या कानशिलात लगावल्याची चर्चा रंगली आहे.
कानशिलात लगावल्याच्या चर्चेवर लंके काय म्हणाले?
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, कानशिलात लगावल्याच्या चर्चेवर खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आढळगाव येथे आंदोलन स्थळी गेलो असता मी माझ्या स्टाईलने अधिकाऱ्यांना सांगितलं. मात्र, 'ध'चा 'मा' करण्यात आला आहे. मी कुणावरही हात उचलला नाही. मात्र, आढळगाव ते जामखेडपर्यंतच्या अपूर्ण कामात हलगर्जीपणा झालेला आहे. यापुढे तो होऊ देणार नाही, असंही पुढे नीलेश लंके यांनी म्हटलं आहे.
