Nilesh Lanke : मागील काही दिवसांपासून औरंगजेबाची (Aurangzeb) कबर ही राजकारणाच्या केंद्रस्थानी आलीये. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून काढून टाकावी अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत बोलताना म्हटलं होत की, औरंगजेबाची कबर हटवण्याची सगळ्यांची इच्छा आहे. मात्र, त्याला कायदेशीर अडचणी आहेत. काँग्रेसच्या काळातच पुरातत्त्व विभागामार्फत त्या कबरीला संरक्षण देण्यात आलं होतं. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी हल्लाबोल केलाय. 

औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारची वेळकाढूपणाची भूमिका सुरू आहे. तुम्ही राज्याचे नेतृत्व करता, तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकतात. अनेक ठिकाणी तर पोलीस बळाचा वापर करून चुकीच्या गोष्टी सरकार घडवून आणते, तर या गोष्टी करणं काही अशक्य गोष्ट नाही. पण, सरकारचा वेळकाढूपणा सुरु आहे. दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक आहे, असा म्हणत निलेश लंके यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय.  

धनंजय मुंडेंबाबत काय म्हणाले निलेश लंके? 

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. त्यातच याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील सहआरोपी करावे अशी मागणी होत आहे. यावर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, सत्यता काय आहे ते पडताळून घ्यावे. केवळ आरोप करण्यात अर्थ नाही. मात्र, सत्यता पडताळून जर त्यात कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

पाटोद्यातील घटनेवरून संताप

बीड जिल्ह्यातल्या पाटोद्यात रक्षकच भक्षक झाल्याची घटना घडली. महिला दिनाच्या दिवशीच पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदाराने एका महिलेवर बलात्कार केला. याबाबत बोलताना निलेश लंके यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. चुकीच्या पद्धतीने राज्यात आलेल्या या सरकारचा कोणत्याही प्रकारचा कंट्रोल राहिलेला नाही. ज्या पोलिसांकडे आपण रक्षक म्हणून पाहत असतो ते जर भक्षक झाले तर हे नंदनीय गोष्ट असल्याचा मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.  वारंवार राज्यात अशा घटना घडत आहेत, हे या सरकारचं अपयश असल्याचं खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.  

राजकीय स्वार्थासाठी कारवाई होत नसेल तर...

निलेश लंके पुढे म्हणाले की, बीड गुंडगिरीबाबत हिट लिस्टवर असलं तरी राज्यामध्ये राजकीय पाठिंब्यावर गुंडगिरी पाहायला मिळत आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक राजकीय व्यासपीठावर देखील पाहायला मिळतात आणि हे जर असं सुरूच राहिलं तर गुंडगिरी संपणार नाही. गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा कुठलाही राजकीय विचार असला तरी त्याचा बंदोबस्त व्हायला हवा. आपल्या राजकीय स्वार्थासाठी जर कारवाई होत नसेल तर हे राज्यासाठीच नाहीतर देशासाठी घातक असल्याची त्यांनी म्हटले आहे.  

आणखी वाचा 

औरंगजेबाच्या थडग्याला केंद्राकडून 6.5 लाख रुपये अन् किल्ल्यावरील मंदिरासाठी वर्षाला फक्त 3000 रुपये? हिंदू जनजागृती समिती आक्रमक