दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला. सीजेपीने आंदोलनाची हाक दिल्यानंतर हजारो कार्यकर्ते दिल्लीच्या दिशेने गेले होते. या आंदोलनाआधी दिल्लीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. पोलिसांनी दिल्लीत येण्याआधी अनेकांना ताब्यात घेतलं. तर काहींना पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतलं. दिपके, सौरव आणि रांका यांना देखील विमानातून ताब्यात घेण्यात आलं. या आंदोलनाच्या दिवशीच अभिजीत दिपकेंच्या आजीचं निधन झालं. आजीच्या निधनाने दिपके कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला. त्यावेळी नेमकं अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याचवेळी त्यांना घरातून फोन आला ते पोलिसांना घरी असलेल्या भावाशी बोलू द्या असं म्हटलं पण पोलिसांनी ऐकलं नाही. त्यावेळी नेमकं काय घडलं याबाबत आशुतोष रांकांनी माहिती दिली. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत देशभरात घडत असलेल्या घडामोडींवरती भाष्य केलं आहे.
आशुतोष रांकांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "काल अभिजीतच्या आजीचे निधन झाले. अभिजीतला याबद्दल माहिती देण्यात आली, तेव्हाही दिल्ली पोलिसांनी अमानवीय वागणूक दिसून आली. पोलिसांनी या घटनेचा तमाशा करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. कालच अभिजितच्या आजीचे निधन झाले. याबद्दल जेव्हा अभिजितला कळवण्यात आले, तेव्हाही दिल्ली पोलिसांनी इतका अमानुष चेहरा दाखवला की ज्यामुळे आज संपूर्ण देशाला लाज वाटत आहे की आपल्या देशाच्या राजधानीची पोलीस अशा प्रकारची आहे. दिपकेला जेव्हा त्याच्या आजीच्या निधनाबद्दल कळवण्यात आले, तेव्हाही तिथे दिल्ली पोलीस कॅमेरा आणि माइक घेऊन उभे होते. त्यांनी या घटनेलाही एक तमाशा बनवण्याचा प्रयत्न केला. दिपके सतत सांगत होता की माझे पालक खूप लवकर घाबरतात (अँशियस होतात), ते हार्ट पेशंट आहेत. तुम्ही मला माझ्या चुलत भावाशी बोलू द्या, जो या वेळी गावी उपस्थित आहे. मला त्याच्याशी बोलायचे आहे, काय झाले हे समजून घ्यायचे आहे. पण दिल्ली पोलिसांनी एकलं नाही. या देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की एखाद्याच्या जवळची व्यक्ती गेल्यावरही हे लोक पूर्णपणे अमानुष वर्तन करतात. आज सुटका झाल्यानंतर लगेचच अभिजित आपल्या आजीच्या अंत्यसंस्कारांमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या गावाकडे निघाला आहे. पण आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, ही लढाई आता सुरू झाली आहे आणि या लढाईला युद्धाचे स्वरूप देण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लाज वाटली पाहिजे.
आशुतोष रांकांनी सांगितलं की, अभिजित दिपकेची अशी इच्छा नव्हती की, त्याची वैयक्तिक बाब सार्वजनिकरीत्या फार चर्चेत यावी. तो असा व्यक्ती नाही जो आपल्या दुःखाचा इव्हेंट बनवेल. तो महामानवासारखा नाही, ज्यांनी आपल्या आईच्या निधनाच्या घटनेचाही एक इव्हेंट बनवला होता. अभिजित तसा माणूस नाही. सीजेपी म्हणून आम्ही अभिजितच्या कुटुंबा प्रति आमच्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. आम्हाला अभिमान आहे की इतका मोठा दु:खाचा डोंगर कोसळूनही तो खंबीर उभा राहिला आणि म्हणाला की जर १० ऑक्टोबर आपली ठरली आहे, तर जोपर्यंत हे लोक आम्हाला जंतरमंतरवर जाऊ देत नाहीत, तोपर्यंत मी येथून हलणार नाही.आम्ही आशा करतो की अभिजितच्या कुटुंबावर जे हे दु:खाच आले आहे, ते त्यातून सावरतील. आणि दुःखाच्या या प्रसंगी आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी उभे आहोत.
नरेंद्र मोदी देशाचे सर्वात महान पंतप्रधान बनू इच्छितात. त्यांच्या महानतेचा तर पत्ता नाही, पण एक गोष्ट आपण नक्कीच सांगू शकतो की, ज्या आणीबाणीबद्दल आपण फक्त ऐकत असलो होतो, ज्या आणीबाणीच्या गोष्टी आपले आई-वडील आपल्याला सांगायचे, गेल्या ७२ तासांत नरेंद्र मोदींनी त्या आणीबाणीलाही मागे सोडले. कारण १९७५ च्या आणीबाणीतही या देशात ट्रेन्स बंद करण्याची गरज भाबली नव्हती. पण हा हुकूमशाहा इतका घाबरलेला आहे, इतका भित्रा आहे की काल या देशात मोठ्या संख्येने ट्रेन्स रद्द करण्यात आल्या. लाखोंच्या संख्येने देशवासीयांना त्रास देण्यात आला. गेल्या ७२ तासांत या देशात अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत, ज्या कदाचित स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत घडलेल्या नाहीत, असंही रांका यांनी म्हटलं आहे.
पुढे आशुतोष रांकांनी म्हटलं की, पण एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाली आहे की, जी लढाई निवडणूक आयोगाविरुद्ध होती, जी लढाई ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध होती, ती लढाई नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी स्वतःविरुद्ध करून घेतली आहे. नरेंद्र मोदींनी हे स्पष्ट केले आहे की, काहीही करून ते ज्ञानेश कुमार यांचे रक्षण करतील. नरेंद्र मोदींनी सिद्ध केले आहे की राजाचा जीव पोपटात आहे. आणि हीच गोष्ट आपण पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, निवडणूक आयोग, ज्याची जबाबदारी या देशातील लोकशाही वाचवण्याची आणि पुढे नेण्याची आहे, तो पूर्णपणे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे, पूर्णपणे कॉम्प्रोमाइज्ड झालेला आहे आणि फक्त आणि फक्त भाजपला जिंकवण्यासाठी ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम करत आहेत. काल तुम्ही सर्व लोकांनी पाहिले की कशा प्रकारे फ्लाईटमध्ये घुसून मला, सौरभला आणि दीपकेला किडनॅप करण्यात आले.
तर दिल्ली पोलिसांची देखील याबाबतची प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी सोशल मिडीया एक्सवरती पोस्ट करत म्हटलं की, "अभिजीतच्या आजीच्या निधनाची माहिती त्याला अत्यंत संवेदनशीलतेने तातडीने कळवण्यात आली होती. तसेच अंत्यसंस्काराच्या नियोजित वेळेची माहिती देऊन, त्याला त्याच्या गावी जाण्यासाठी मानवीय दृष्टिकोनातून सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवण्यात आली होती, मात्र त्याने ती घेण्यास नकार दिला."
