मुंबई : गेल्या चार दशकापासून आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असून राजकीय पद किंवा मंत्रिपदासाठी कोणत्याही भोंदूबाबाला आपण भेटायला गेलो नाही अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिली. आपल्यावर झालेल्या संस्कारामुळे हयात असलेल्या कोणत्याही बाबाच्या दर्शनासाठी आपण जात नाही, त्यामुळे अशोक खरातला कधीही भेटायचा संबंध नाही असं गोऱ्हे म्हणाल्या. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर अशोक खरातची भेट घेतल्याचा आरोप केले होते. त्यावर गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली. 

Continues below advertisement

एक महिला आमदार मंत्रिपदासाठी अशोक खरातच्या कार्यलयात जात होत्या. नीलम गोऱ्हे या गेली पाच ते सहा वर्षे खरातकडे जात होत्या असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी त्यांची बाजू मांडली. अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणात मी ज्यांच्यावर टीका केली ते दुखावले असतील, त्यामुळेच हे आरोप होत असल्याचं सांगत नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. 

Neelam Gorhe On Ashok Kharat Case : खरातची भेट घेतलीच नाही, गोऱ्हेंचा दावा

तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "गेल्या चार दशकांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असून आपल्या कुटुंबीयांनी जे आपल्यावर संस्कार केलेत त्यानुसार काम केलं. गेल्या पाच दशकांमध्ये कोणत्याही भोंदूबाबाच्या दर्शनाला गेले नाही. महिलांची प्रगती आणि सामाजिक न्याय यावर काम केलं. या काळात राजकीय पद किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी मी कधीही भोंदूबाबाच्या दर्शनाला गेले नाही. त्यामुळे नाशिक येथील एका हॉटेलमध्ये खरात नावाच्या व्यक्तीला भेटले ही बातमी स्पष्टपणे नाकारते."

Continues below advertisement

अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपलं कौतुक केल्याने काहीजणांना ते आवडलं नाही. तसेच आपण केलेल्या टीकेमुळे काहीजण दुखावले. त्यामुळेच आपल्यावर आता आरोप केला जात आहे असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. 

सगळीकडे सीसीटीव्ही असतात, अनेक ठिकाणी आपल्यासोबत फोटो काढतात. त्यावेळी जर कुणी गर्दीतून भेटलं असेल तर त्याची माहिती नाही, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. मी कधीच कुठल्या हयात असलेल्या महाराजाकडे गेले नाही, त्यामुळे अशी घटना घडली असेल त्याची शक्यता नाही, असंही त्या म्हणाल्या. 

या प्रकरणात सरकारने एसआयटी तपास सुरू केला आहे. त्यामुळे या बाबतीत मी काही बोलणे योग्य वाटलं नाही. अधिवेशन सुरू असल्याने त्या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे ज्यांना काही आरोप करायचा आहे त्यांनी तो करावा, पण त्यासंबंधी पुरावे जाहीर करावेत, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. 

ही बातमी वाचा: