Praful Patel and Sunil Tatkare NCP: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत वाद सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल (Praful Patel) या दोन बड्या नेत्यांना पक्षातून साईडलाईन करण्यात आल्याची कुजबुज केली जात आहे. या दोन्ही नेत्यांवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची खप्पामर्जी झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे सुनेत्रा पवार आणि त्यांच्या दोन्ही लेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सुत्रे आपल्या हातात घेतल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल पटेल यांना डच्चू देण्यात आल्याची चर्चा होती. तर सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचाही प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख टाळण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. अशातच आता दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या गटातील नेत्याला पक्ष कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. तसेच या नेत्याला पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत गैरसमज पसरवू नयेत, अशी तंबी देण्यात आल्याचे सांगितले जाते.  

पक्षासंदर्भात चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना पक्षाच्या नेत्यांकडून समज देण्यात आली असून दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना पक्ष कार्यालयात रोखून धरले आणि त्यांना पक्षाची बदनामी का करत आहात, असा जाब विचारला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यकारिणीत ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे श्रीवास्तव हे प्रचंड नाराज झाले होते. याच ब्रिजमोहन श्रीवास्तव  राष्ट्रवादीच्या पक्षाची घटना बदलण्याच्या प्रयत्नात तटकरे आणि प्रफुल पटेल यांची साथ दिली होती, अशी वदंता आहे. ब्रिजमोहन श्रीवास्तव हे या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक आयोगाचे पक्षाचे अधिकृत संपर्क प्रमुख होते. त्यांच्याच मेलवर सर्व पक्षाचा पत्रव्यवहार होत असल्यानं पक्षाची घटना बदलण्याच्या प्रयत्न ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी केला होता, असा आरोप झाला होता. त्यानंतर नव्याने आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी त्यांचा समावेश नसल्यानं दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींना पक्षात अंतर्गत वाद असून नव्या कार्यकारिणीमध्ये फक्त नातेवाईकांना संधी दिली असल्याचे संदेश पाठवले होते. विशेष म्हणजे या संदेशात चुकीचे नाते दाखवून पवार कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या युवक राष्ट्रवादी काँग्रसेच्या कार्यकर्त्यांनी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कार्यालयात जाण्यापासून रोखून जाब विचारल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरु असल्याच्या चर्चांना आणखीनच बळ मिळाले आहे. 

NCP News: तटकरे आणि पटेलांना कार्यालयात जाण्यापासून रोखल्याच्या चर्चा खोट्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेत्याचं स्पष्टीकरण

सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्टीकरण युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा यांनी दिले. आमच्या कार्यालयात अशी कोणतीही गोष्ट घडली नाही. आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने किंवा कार्यकर्त्याने असे कृत्य केलेले नाही. काही लोक जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवत आहेत, त्यांच्याबद्दल पक्षात रोष आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्ष पार्थ पवार, सुनेत्रा पवारजी , सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत आहे, असे धीरज शर्मा यांनी सांगितले.

आणखी वाचा

प्रफुल पटेल अन् शरद पवारांची सिल्व्हर ओकवर गुप्तभेट? तटकरेंच्या आधीच येऊन बसले पण कोणाला सुगावाही लागला नाही