मुंबई : दिवंगत नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. बारामतीत अजित दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचे अस्थीकलश सर्वच जिल्ह्यात पाठवले जात असून राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अजित पवार (Ajit pawar) यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. अजित दादांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनाच नेतृत्व देऊ हा सगळ्यांचा आग्रह आहे. सर्वांनी म्हटलं की सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) ह्याच आपल्या पक्षाच्या नेत्या राहतील. तर, तीन दिवसांचा शोक पाळणे ही पवार कुटुंबाची परंपरा,  त्यामुळे चौथ्या दिवशी आम्ही शपथविधी केला, असे म्हणत प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडेच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच, घाईघाईने शपथविधी का केला, याचेही स्पष्टीकरण दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्याकडून अजित दादांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  

अजित दादा आणि मी एकत्रच राजकारणात आलो, 1991 साली पहिल्यांदा दादा आणि आम्ही राजकीय सुरुवात केली. मात्र, दुर्दैवी घटनेमुळे आज अजित दादा आपल्यात नाहीत. अजूनही अजित पवारांचा चेहरा डोळ्यासमोर येतो, दादा आपल्यात आज नाहीत यावर विश्वास बसत नाही. 15 दिवसांपुर्वी मी त्यांच्याशी बोललो, तेव्हा झेडपी इलेक्शन्सची तयारी सुरू होती. प्रफुलभाई आता आपली भेट होणार नाही, मी सात-आठ दिवस झेडपीच्या दौऱ्यावर असेन त्यांचं हे पहिलं वाक्य मी अजूनही विसरू शकत नाही, असे म्हणत प्रफुल पटेल यांनी अजित दादांची शेवटची आठवण सांगितली. 

1991 मध्ये आम्ही दोघं एकत्र राजकारणात उतरलो, गेली कित्येक वर्षं आम्ही एकत्रच काम केलं. अजित पवारांनी आयुष्यात आलेले अनेक चढ-उतार मोठ्या हिमतीने पार केले. जेव्हा 2023 मध्ये आम्ही मोठा निर्णय घेतला तेव्हा आम्ही एकत्रित पद्धतीने सगळी आव्हानं पेलली. मात्र, त्यानंतर आता जेव्हा आम्ही आणखी पुढे जाण्याचा निर्णय घेणार होतो, तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली. हा संपूर्ण परिवार राष्ट्रवादीचा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे. अजित पवारांची जी काम करण्याची पद्धत आहे, ती तशीच पुढे चालू ठेवण्याचा आमचा निर्धार आहे. काम करा, पुढे जावा आणि वचनपूर्ती करा हीच अजित दादांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल, असेही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले.

तिसऱ्या दिवशीच दशक्रिया विधी

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. येत्या 6 जानेवारीला त्यांचा दशक्रिया विधी होणे अपेक्षित होते. मात्र, अजित पवार यांचा दशक्रिया विधी अगोदरच पार पडल्याची माहिती त्यांचे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे, यापुढे अजित पवार यांच्या अंत्यविधीचे कुठेलीही विधी होणार नसल्याचेही सांगण्यात आले. 

हेही वाचा

जित पवारांचे पुढचे कोणतेही विधी होणार नाहीत, श्रीनिवास पवारांनी कारण सांगितलं!