रायगड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार (Ajit pawar) यांचे अकाली निधन झाल्याने राज्यावर शोककळा पसरली. या निधनानंतर अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन जोरदार चर्चा सुरू झाली. त्यातच, भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले असल्याचे म्हटले. त्यानंतर, माध्यमांतून राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचं नाव पुढे आल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही ट्विट करत, राष्ट्रवादी काँग्रेस या मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष कुणीही पाटील असावा, पटेल नसावा असे म्हणत भूमिका मांडली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही जोरदारपणे भूमिका मांडली. त्यानंतर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी (Sunil Tatkare) याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. आता, त्यावर, शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले (Bharat gogawale) यांनी भूमिका मांडली आहे. 

Continues below advertisement

मुलाखतीत पियुष गोयल यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांचं अनवधानाने नाव आल्याचं सुनिल तटकरे यांनी म्हटलं. त्यानंतर, आता भरत गोगावले यांनी यावरुन सुनिल तटकरेंना टोला लगावला आहे. अनावधानाने नाव येतचं कसं? असे म्हणत मंत्री गोगावले यांचे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्यावरुन सुनील तटकरेंना टोला लगावला. रायगडमध्ये तटकरे आणि गोगावले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? अशी चर्चा असताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज एका मुलाखतीत प्रफुल पटेल यांच्या नावाबाबत स्पष्टीकरण दिलं. पियुष गोयल यांच्या तोंडून प्रफुल पटेलांचं नाव अनवधानाने आले असे म्हटले होते. त्यावरून भरत गोगावले यांनी तटकरे यांना टोला लगावला. पूर्वकल्पी ठरलेले असताना अस अनवधानाने कसं नाव येतं? असा सवाल गोगावलेंनी उपस्थित केला. तसेच, अजित दादा निघून गेल्याला अजून बारा दिवस देखील झाले नाहीत. तोवरच सगळ्या पदांच्या नेमणूक सुरू झाल्याचंही त्यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

सुनिल तटकरेंची आज रायगडमध्ये सभा

अजित दादांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांची रायगडमध्ये आज पहिली सभा संपन्न होत असून रायगडच्या इंदापूर येथे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. आगामी काळात येऊ ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांची आज रायगड मध्ये पहिली प्रचार सभा पार पडत आहे. अजित दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची ही पहिलीच सभा असून तटकरे या सभेतून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा

Ajit Pawar : विमानातून कुणीतरी बाहेर पडण्याची धडपड करत होतं; सरपंचांची माहिती, अमोल मिटकरींचा मोठा दावा