मुंबई : भाजप नेत्या नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार (Navneet Rana Sunetra Pawar) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसंदर्भात ही भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकरण पुणे मतदारसंघासाठी पक्षाबाहेरील विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर आता भाजपमध्ये गेलेल्या नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठविण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Navneet Rana Sunetra Pawar)

Continues below advertisement

Rajya Sabha Seat : छगन भुजबळ हे इच्छुक असल्याची चर्चा

राज्यसभेच्या या जागेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे इच्छुक मानले जात आहेत. मात्र नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षातील निर्णय प्रक्रियेवर खासदार पार्थ पवार यांच्या गटाचा प्रभाव वाढल्याची चर्चा उघडपणे होऊ लागली आहे. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल पटेल यांचे नाव वगळण्यात आल्यानंतर ते पक्षात फारसे सक्रिय दिसत नसल्याचे देखील बोलले जात आहे. तसेच सुनील तटकरे हे देखील नाराज असल्याची चर्चा असून पक्षातील असंतुष्ट नेत्यांची संख्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

या राज्यसभा जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ८ जून आहे. त्यामुळे या जागेसाठी पक्षातील विविध नेत्यांनी लॉबिंग सुरू केले असून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत. अखेर पक्षश्रेष्ठी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Continues below advertisement

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी २०२४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत चर्चा सुरू आहेत. यासाठी त्यांनी अलीकडे भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याचेही बोलले जाते. मात्र रिक्त राज्यसभा जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील असल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतरच त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचे समजते.

Rajya Sabha Seat : राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा? भेटीगाठीमुळे चर्चा

 राज्यसभेच्या 24 रिक्त जागा आणि पोटनिवडणुकीसाठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधून प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून प्रत्येकी 3, झारखंडमधून 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश व मिझोराममधून प्रत्येकी 1 जागेचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील आणि तामिळनाडूमधील एका जागेसाठी पोटनिवडणूक देखील याच दिवशी होईल. आगामी 18 जून रोजी मतदान पार पडणार आहे आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केले जातील. याचदरम्यान, एक महत्वाची घडामोड घडत असल्याचं दिसून येत आहे. माजी खासदार नवनीत राणा यांचा राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठीचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे. यासाठी नवनीत राणा यांनी बुधवारी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार  यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भेट घेतली.  त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील जागेवर नवनीत राणा यांना उमेदवारी मिळावी, यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र आपल्या कोट्यातील जागा नवनीत राणा राष्ट्रवादीसाठी सोडणार का? हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे या भेटीगाठीमुळे सुनेत्रा पवारांच्या जागी नवनीत राणा यांची वर्णी लागते का?, हे आगामी दिवसांत स्पष्ट होईल.

Rajya Sabha Seat : अमोल मिटकरींची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत 

अमोल मिटकरींनी यासंदर्भात पोस्ट करत म्हटलंय की, आदरणीय सुनेत्रावहिनींची राज्यसभेची रिक्त जागा ही फक्त राष्ट्रवादीचीच आहे! यावर दुसऱ्या कुणी हक्क सांगून मोर्चेबांधणी करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला “अजितदादा”नावाचं अधिष्ठान आहे. त्यामुळे आदरणीय वहिनी घेतील तोच निर्णय अंतिम राहील. हा पक्ष अजितदादांचा दरारा असणारा पक्ष आहे. तुर्तास इतकेच, असंही अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.