मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सातत्याने नवनवीन राजकीय घडामोडी घडत असून आधी विधानपरिषद, नंतर राज्यसभा आणि आता विद्यमान आमदाराच्या राजीनाम्यामुळे जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून त्यांच्या बोलण्यातूनही ते जाणवत आहे. त्यातच, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून आमदार इद्रीस नाईकवाडी यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी केली जात आहे. यासंदर्भात देवगिरी बंगल्यावर बैठकही पार पडली. विशेष म्हणजे इद्रीस नायकडवाडी (Idris naikwadi) यांनाही बैठकीसाठी बोलण्यात आलं होतं. 

Continues below advertisement

इद्रीस नाईकवाडी यांना आज देवगिरीवर बोलवण्यात आलं होतं, आमदारकीचा राजीनामा द्या, पक्ष भविष्यात तुम्हाला मोठी संधी देईल,असे आश्वासन बैठकीत वरिष्ठांकडून देण्यात आले. मात्र, राजीनामा न देण्यावर इद्रीस नाईकवाडी ठाम असल्याची माहिती आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार आणि इद्रीस नाईक यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत आपण आमदारकीचा राजीनामा देणार नाही, अशी भूमिका इद्रीस नाईकवाडी यांनी मांडल्याची सूत्रांची माहिती आहे.

पार्थ पवार दुसऱ्या चेहऱ्याला संधी देणार?

दरम्यान, इद्रीस नाईकवाडी हे विधान परिषदेचे आमदार आहेत, नाईकवाडी यांनी राजीनामा दिल्यास दुसऱ्या नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी पार्थ पवार प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. गेल्याच महिन्यात राष्ट्रवादीचे सरचिटणीस आनंद परांजपे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. 

Continues below advertisement

अजित पवारांनी दिली आमदारकीची संधी

इद्रीस नायकवडी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांनी अल्पसंख्यांक चेहरा म्हणून इद्रीस नायकवाडी यांना विधानपरिषद आमदारकीची संधी दिली होती. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर आता पक्षातील नेतृत्वाकडून त्यांना राजीनामा मागितला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे स्वीय सहायक इद्रीस नायकवाडी यांना भेटल्याचे समजते.

आमदार इद्रीस नायकवाडी कोण?

इद्रीस नायकवाडी हे सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेचे माजी महापौर असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. दिवंगत नेते अजित पवारांच्या नेतृत्वात राज्यपाल नियुक्त कोट्यातून 15 ऑक्टोबर 2024 ला त्यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्यात आले होते. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून अल्पसंख्यांक चेहरा म्हणून त्यांना संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नायकवाडी यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. अल्पसंख्याक समाजात नायकवडी यांच योगदान आणि महत्व आहे. त्यामुळेच, त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली होती. 

राजीनाम्याचा जुना किस्सा

इद्रीस नायकवाडी यांच्यासोबत राजीनामा मागण्याबाबत यापूर्वीही एक प्रसंग घडला होता. सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेचा महापौर असताना राजीनामा देण्यासाठी मला दबाव आणला होता. त्यावेळी नेतृत्वाला मी राजीनामा देणार नाही हे स्पष्ट केलं होतं. मुळात त्यावेळी मी स्थानिक आघाडी करून 48 नगरसेवक निवडून आणले होते आणि महापौर झालो होतो, त्यामुळे मी राजीनामा देणार नसल्याचं सांगितल होतं, अशी आठवणही इद्रीस नायकवाडी यांची सांगितली जाते.

हेही वाचा

मोठी बातमी! अब्दुल सत्तारांना दे धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार अन् संजना जाधवांचा अर्ज बाद