NCP Foundation Day : मोठी बातमी! एनडीएच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचा वर्धापनदिन पुढे ढकलला; सुनेत्रा पवार, तटकरे-पटेल दिल्लीला जाणार
NCP Foundation Day Postponed : पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीत 10 जून रोजी एनडीएच्या पक्षांची बैठक बोलावली असल्याने पक्षाचा वर्धापनदिन पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यंदाचा 27 वा वर्धापन दिन सोहळा (NCP Foundation Day) एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. दरवर्षी 10 जून रोजी साजरा केला जाणारा हा पक्षीय सोहळा आता गुरुवार, 11 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतील किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. नवी दिल्लीत एनडीएची (NDA) महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे हा बदल करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जून 1999 रोजी झाली होती. मात्र या वर्षी 10 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एनडीए घटक पक्षांची तातडीची बैठक बोलावली आहे. या राष्ट्रीय बैठकीला देशभरातील एनडीएचे सर्व प्रमुख घटक पक्ष, त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. महायुती आणि एनडीएचा एक भाग म्हणून या बैठकीला उपस्थित राहणे अत्यंत आवश्यक असल्यानं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे 10 जून रोजी दिल्लीत असणार आहेत.
Sunil Tatkare Press Conference : दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा होणार आढावा
देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी आणि एनडीएला देशसेवेची संधी दिली आहे. जगभरात युद्धाचे सावट असतानाही भारताने केलेली प्रगती आणि एनडीए सरकारच्या मागील दोन वर्षांच्या पूर्ततेचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. तसेच एनडीएच्या भक्कम एकसंघ वाटचालीचे मंथन या बैठकीत होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी दिली.
दिल्लीतील बैठक पूर्ण करून सर्व नेते परतल्यानंतर, 11 जून रोजी दुपारी 2 वाजता षण्मुखानंद सभागृहातच हा सोहळा होईल. केवळ तारखेत बदल झाला असून जागा तीच आहे, हे तटकरे यांनी स्पष्ट केलं.
Sunetra Pawar Leadership : सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली नवी भरारी
माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्ष पहिल्यांदाच आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अतिशय संयमाने आणि धिरोदत्तपणे पक्षाची धुरा सांभाळत सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपद आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. हा वर्धापन दिन 'दादांना समर्पण... संघर्ष आणि संकल्प' या विचाराने साजरा केला जाणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी सांगितली.
संघटनात्मक मजबुतीबाबत बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, "पक्षाला सन 2029 च्या आगामी मोठ्या आव्हानांना एनडीए म्हणून सामोरं जायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 50 टक्के आरक्षणाच्या निर्णयानंतर, राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा राज्यव्यापी दौरा नियोजित करण्यात येत आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी बूथ पातळीपासून ते देश पातळीपर्यंत मजबूत करण्याला आणि पक्ष विस्ताराला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल."
ही बातमी वाचा:
Before You Go
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'






















