NCP Crisis : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (NCP Sharad Pawar Group) आणि अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Group) एकत्रीकरणाच्या चर्चा राज्यभरात रंगल्या आहेत. यावरून माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधलाय. 2009 ते 2024 कालावधीत राष्ट्रवादीची वाट कोणी लावली? राष्ट्रवादीमध्ये अनेक जण कात्री घेऊन बसले होते आणि यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसची वाट लागली, असा टोला त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांना लगावला.
तर यामुळेच आम्ही शरद पवार यांच्यापासून दूर गेलो होतो. मात्र नंतर जयंत पाटील यांच्यामुळे जवळ येण्याची संधी मिळाली आणि आज सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त खासदार आणि आमदार हे शरद पवार गटाचे त्यामुळेच निवडून आले, असा दावा देखील धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलाय.
त्यातूनच आम्हाला पक्षापासून दूर जावे लागले
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नूतन जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांच्या सत्कार सोहळ्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीची वाट कशी लागली? हे दाखवून दिले. 2009 पासून 2024 पर्यंत अनेक जण हातात कात्री घेऊन कापाकापी करत होते आणि त्यातूनच आम्हाला पक्षापासून दूर जावे लागले, अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. मात्र, नंतर दूर गेल्यावर आम्ही जवळ आलो आणि आज सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त खासदार आणि आमदार हे शरद पवार गटाचे निवडून आणले, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मोहिते पाटील यांचे पंख कापण्याचे काम अजित दादा पवार यांच्याकडून होत असल्याच्या चर्चा होत्या आणि यातूनच मोहिते पाटील हे 2019 ला भाजपमध्ये गेले होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने मोहिते पाटील यांनी पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करीत खासदारकी मिळवली होती. आता पुन्हा दोन राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू झाल्यावर खासदार मोहिते पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
आणखी वाचा