NCP Meeting Parth Pawar: राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवारांनी शब्द दिला, म्हणाले इथून पुढे.....
NCP Meeting Parth Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठ नेते समोर बसले, पार्थ पवारांनी शब्द दिला, म्हणाले इथून पुढे...

NCP Meeting Parth Pawar: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार (Parth Pawar), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, कमिटीचे सदस्य दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा गट हा पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे आज कोअर कमिटीच्या बैठकीत काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आज झालेल्या बैठकीत या सगळ्यावर पूर्णपणे तोडगा निघाला नाही. मात्र, पार्थ पवार यांनी या बैठकीत इथून पुढे कोअर कमिटीला विचारुन निर्णय घेतले जातील, असा शब्द दिल्याचे समजते. (Maharashtra Politics news)
कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादावर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी मौन बाळगल्याचे दिसून आले. पार्थ पवार यांच्या आदेशाने अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी आणि राष्ट्रीय प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्त्या करताना कोअर कमिटीला विचारात न घेतल्याने राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांचा गट नाराज झाला होता. त्यामुळे या नियुक्त्यांबाबत फेरविचाराची शक्यता वर्तविली जात होती. मत्र, आजच्या बैठकीत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या कायम राहतील, हे स्पष्ट झाले. मुंबई अध्यक्ष म्हणून झिशान सिद्धकी आणि मुख्य प्रवक्ते उमेश पाटील पुढील सहा महिने काम करतील. सहा महिन्यातील काम पाहून नंतर निर्णय घेऊ, अशी भूमिका पार्थ पवार यांनी बैठकीत मांडल्याचे समजते. तसेच आगामी काळात कोअर कमिटीला विचारात घेऊनच निर्णय घेतले जातील, याचा पार्थ पवारांकडून पुनरुच्चार करण्यात आल्याचेही समजते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या पदांबाबतचा संभ्रम अद्यापही कायम असल्याची सूत्रांची माहिती आहे.
आणखी वाचा






















