मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असून अद्यापही दोन्ही मंत्रिपदे रिक्त आहेत. त्यापैकी, आमदार धनंजय मुंडे आणि आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेली खाती दुसर्या मंत्र्यांकडे देण्यात आली आहेत. धनंजय मुंडेंकडे (Dhananjay munde) असलेलं अन्न व नागरी पुरवठा खातं मुंडेंचं मंत्रिपद गेल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देत त्यांच्याकडे देण्यात आलं. तेव्हापासून धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमात किंवा जाहीर सभांमध्ये कमी प्रमाणात दिसून आले. आता, त्यांच्यावरील कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपात त्यांना क्लीन देण्यात आल्यानंतर ते पुन्हा मंत्रिपदासाठी प्रयत्न करत आहेत. आता, याच अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) उत्तर दिलंय.
छगन भुजबळ हे आज दिल्ली दरबारी असून राज्याती गॅस व इंधन पुरवठ्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांसोबत त्यांची बैठक झाली, या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे का, कारण तुमच्या पक्षातील दोन मंत्रिपदे रिक्त आहेत. तसेच, नुकतेच रुपाली चाकणकर यांनीही महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला छगन भुजबळांना विचारला होता. त्यावर, उत्तर देताना मंत्रिमंडळ विस्ताराचा सर्वस्वी निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे, ते यासंदर्भात ठरवतील. तसेच आमच्या पक्षातील मंत्रिपदाबाबत आमच्या पक्षाच्या प्रमुख, राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार ह्या निर्णय घेतील, मी काय सांगणार असे उत्तर छगन भुजबळ यांनी दिले.
धनंजय मुंडे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे हा प्रश्न विचारला जातोय. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर ते मंत्री होतील का? असा प्रश्न देखील पत्रकारांनी भुजबळांना विचारला. त्यावर, मी काही अशोक खरात नाही हात बघणारा, उद्या काय होणार हे सांगायला? असे मिश्कील उत्तर छगन भुजबळ यांनी दिले, त्यामुळे पत्रकारांमध्येही हशा पिकल्याचं दिसून आलं.
अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीलाच मिळेल
अजित पवारांकडे असलेलं अर्थमंत्रीपद सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने ते खाते तात्पुरते मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आले होते, आता ते खातं तुमच्याकडे कधी येईल असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांना विचारण्यात आला होता. त्यावर, ते खातं आमच्याकडे येईल, आत्ताच तर अधिवेशन संपलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जी खाते होती, ती मिळणारच असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
अशोक खरातच्या कृत्यात सहभागी नाही, कुठल्याही महिलेची ओळख करून दिली नाही; दीपक केसरकरांनी मौन सोडलं
