Nashik Vidhan Parishad Election Result 2026: राज्यभरात चर्चेत आलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election 2026) अत्यंत धक्कादायक निकाल लागला आहे. भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचा धुव्वा उडवला आहे. पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवून गोकुळ गीते यांनी नाशिकच्या गडात ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या धक्कादायक पराभवामुळे महायुतीला मोठा झटका बसला आहे. या राजकीय भूकंपावर जिल्ह्यातील महायुतीचे प्रमुख नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
नरेंद्र दराडे यांच्या पराभव करत गोकुळ गीते यांनी विजय खेचून आणला. याबाबत पत्रकारांनी विचारले असता मंत्री दादा भुसे यांनी अवघ्या दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली. "आम्ही सगळ्याची शहानिशा करू. आमचे नेते एकनाथ शिंदे यावर भाष्य करतील," असे म्हणत दादा भुसे यांनी या निकालावर बोलणे टाळल्याचे पाहायला मिळाले.
Gokul Gite on Narendra Darade: गोकुळ गीतेंचा दराडेंवर घणाघात
दुसरीकडे, नाशिक विधान परिषद निवडणुकीत विजय संपादित केल्यानंतर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले. निफाड तालुक्यातील शिंगवे येथील आपल्या मूळ गावी मातोश्री आणि कुटुंबीयांकडून औक्षण करून घेतल्यानंतर त्यांनी दराडे कुटुंबावर जोरदार टीका केली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी फोनवरून गोकुळ गीते यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप गोकुळ गीते यांनी केला होता. कुणाल दराडे यांनी आमचा बाप काढल्यामुळे नाराज आहोत, अशा प्रकारे धमकी दिल्याने मी आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असे गोकुळ गीते म्हणाले होते. आता विजयानंतर गोकुळ गीते यांनी "निवडणुकीत माझा बाप काढण्यात आला होता, माझे वडील 7, 8 वर्षांपासून पॅरेलाईज आहेत. त्यामुळे मी माझा बाप दाखवून दिला," असे म्हणत दराडेंवर निशाणा साधला आहे.
Ganesh Gite on Narendra Darade: गणेश गीतेंनीही डिवचलं
नरेंद्र दराडे यांच्या पराभवाचे विश्लेषण करताना गणेश गीते यांनी मतदारांमधील रोष आणि दराडे यांच्या जनसंपर्काचा अभाव यावर घणाघाती टीका केली. गणेश गीते म्हणाले की, "पहिल्या दिवसापासून शिवसेनेच्या उमेदवारावर प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष होता. त्यामुळे मतदारांनी कौल गोकुळ गीतेंना दिला. कोणाचा बाप काढणे ही दराडेंची संस्कृती आहे, आम्ही कोणाचा बाप काढलेला नाही, लोकांनी गोकुळ गीतेंना भरभरून न्याय दिलेला आहे," असे त्यांनी म्हटले. तसेच, "आठ वर्षांपूर्वी दराडे निवडून आले, त्यानंतर त्यांनी कोणाशीही संपर्क ठेवला नाही. कोणाच्या सुखदुःखात कधी गेले नाहीत. कोणाच्या कामात पण आले नाही. त्यामुळे जनता निश्चितपणे अशा उमेदवाराला नाकारते," असे म्हणत गणेश गीते यांनी नरेंद्र दराडेंवर हल्लाबोल केला.
Nashik Vidhan Parishad Election Result 2026: नाशिक विधान परिषद निवडणूक अंतिम निकाल
नाशिक एकूण मतदान - 618
अवैध मतदान - 13
वैध मतदान - 605
फायनल कोटा - 303
अपक्ष गोकुळ गीते - 357
शिवसेना नरेंद्र दराडे - 248
निकाल - गोकुळ गीते विजयी
आणखी वाचा
