Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिक विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे (Mahayuti) अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोरील अडचणी दूर करण्यात अखेर वरिष्ठ नेत्यांना यश आले आहे. महायुतीसमोर मोठे आव्हान उभे करणारे बंडखोर उमेदवार (Rebel Candidate) गोकुळ गिते आज आपली बंडाची तलवार म्यान करण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकीय वातावरणात कमालीची गुप्तता आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचे संकटमोचक मानले जाणारे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे विशेष विमानाने नाशिकमध्ये दाखल झाले असून, ते थेट गणेश गिते आणि गोकुळ गिते यांच्या निवासस्थानी पोहोचले. मात्र, या भेटीदरम्यान घडलेल्या एका वेगळ्याच दृश्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Continues below advertisement

मंत्री उदय सामंत हे गणेश गिते यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर तिथे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे आणि आमदार किशोर दराडे हे देखील उपस्थित होते. मात्र, जिथे मंत्री उदय सामंत, गणेश गिते, गोकुळ गिते आणि शिवसेनेचे इतर प्रमुख पदाधिकारी चर्चा करत होते, तिथून बाजूला म्हणजेच दुसऱ्या खोलीत दराडे बंधू बसून होते. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Nashik Vidhan Parishad Election 2026: गोकुळ गीतेंच्या देहबोलीने वाढवली चर्चा

सुमारे आठ दिवस रंगलेल्या या मनधरणी नाट्यानंतर गोकुळ गिते यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली असली, तरी त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून जात होते. बैठकीदरम्यान गोकुळ गिते यांची देहबोली अत्यंत शांत आणि काहीशी संथ पाहायला मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी जाणवत होती. त्यामुळे गोकुळ गिते हे स्वेच्छेने मागे हटत आहेत की केवळ ज्येष्ठ मंत्र्यांचा शब्द राखण्यासाठी आणि वरिष्ठांच्या दबावामुळे हा निर्णय घेत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Continues below advertisement

नाशिकमध्ये मागील आठवड्यात मनधरणी नाट्य रंगल्यानंतर, काल मुंबईत गणेश आणि गोकुळ या गिते बंधूंची मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांनी पुन्हा भेट घेतली होती. सुमारे दोन तास चाललेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर गोकुळ गिते यांचे बंड शमविण्यात नेत्यांना यश आले. गिते बंधू हे काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत गेले होते, मात्र दोन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर असल्याने थेट भेट होऊ शकली नाही. तरीही, वरीष्ठ नेत्यांच्या फोनवरील पुढाकारामुळेच हे बंड थंड झाल्याचे बोलले जात आहे.

Nashik Vidhan Parishad Election 2026: नरेंद्र दराडेंचा मार्ग सुकर होणार

गोकुळ गिते यांनी निवडणुकीतून थांबण्याचा निर्णय घेणार असल्याची असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग आता सुकर होणार आहे. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अधिकृत दिवस उलटून गेल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या गोकुळ गिते यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रक्रिया पार पाडावीच लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आज आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकार परिषदेत मंत्री उदय सामंत आणि गिते बंधू नेमके काय बोलणार, याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

नाशिक विधानपरिषद निवडणूक! गोकुळ गिते माघार घेणार? मुंबईत मंत्री महाजनांसह सामंतांशी सकारात्मक चर्चा