Nashik Vidhan Parishad Election 2026: राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election 2026) रणधुमाळी जोरात सुरू आहे. मात्र, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीला (Mahayuti) मोठ्या बंडखोरीचा (Rebellion) सामना करावा लागत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी नाशिकमध्ये प्रचंड 'हायव्होल्टेज ड्रामा' (High Voltage Drama) पाहायला मिळाला. कुणाल दराडे यांनी फोनवरून शिवीगाळ करत धमकी दिल्यामुळे गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी अर्ज मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. धमकी दिल्याने माघार न घेण्याच्या भूमिकेवर गोकुळ गीते ठाम राहिले असून, महायुतीतील बंडखोरीचे वादळ शमवण्यात अडचणी येत आहेत.

Ganesh Gite: देवेंद्र फडणवीस-गिरीश महाजनांना दिलेला शब्द पाळणार: गणेश गीते

दुसरीकडे, गोकुळ गीते यांचे बंधू आणि माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते (Ganesh Gite) हे स्वतःचा अर्ज मागे घेण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना गणेश गीते म्हणाले, "आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. आम्ही जो शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना दिला होता, तो शब्द आम्ही पाळणार आहोत." तसेच, गोकुळ गीते हे देखील लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात येतील आणि माघार घेतील, असा विश्वास गणेश गीते यांनी व्यक्त केला. यादरम्यान गणेश गीते यांच्या सहकाऱ्यांनी मीडियासमोरच फोनवर गोकुळ गीते यांच्याशी बातचीत करत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

Gokul Gite: 'आमचा बाप काढल्याने नाराज'; गोकुळ गीतेंची ठाम भूमिका

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल दराडे यांनी फोनवरून संपर्क साधून गोकुळ गीते यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. आमचा बाप काढल्यामुळे मी नाराज आहे. अशा प्रकारे धमकी दिल्याने मी आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, अशी बतावणी करत गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत.

Ganesh Gite: शेवटच्या 15 मिनिटांत उपमुख्यमंत्री-भाजप प्रदेशाध्यक्षांचे फोन

नाशिकमधील ही बंडखोरी रोखण्यासाठी आणि गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले होते. अर्ज मागे घेण्यासाठी अवघे 15 मिनिटे उरले असताना राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा (Nilesh Bora) यांना थेट फोन लावला आणि गोकुळ गीते यांच्या माघारीबाबत सविस्तर माहिती घेतली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही तातडीने गणेश गीते यांना फोन केला. चव्हाणांच्या फोननंतर गणेश गीते यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न आणखी तीव्र झाले.

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला काही अंशी यश आले असून गणेश गीते माघार घेत आहेत. मात्र, त्यांचे बंधू गोकुळ गीते यांना महाविकास आघाडीने आणि इतर विरोधकांनी पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. कुणाल दराडे यांच्या कथित धमकीनंतर गोकुळ गीते अपक्ष लढण्यावर ठाम राहिल्यास, महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या अडचणी कमालीच्या वाढू शकतात. त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत नाशिक विधानपरिषदेचा हा राजकीय सस्पेन्स कायम असून, गोकुळ गीते नेमका काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

आणखी वाचा 

Who is Gokul Gite: कोण आहे गोकुळ गीते, त्यांच्या मागे कुणाची ताकद, विधानपरिषद निवडणुकीवरुन नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय?