Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाशिकच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडत आहेत. महायुतीमधील (Mahayuti) बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी थेट मैदानात उतरून मोठा खुलासा केला आहे. नाशिकच्या जागेबाबत कोणताही तिढा नसून गणेश गीते (Ganesh Gite) माघार घेत आहेत, तर त्यांचे बंधू गोकुळ गीते (Gokul Gite) थोडे आग्रही असले तरी तेही थोड्या वेळात आपली उमेदवारी मागे घेतील, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
Girish Mahajan: गिरीश महाजनांनी काय सांगितले?
नाशिकच्या या संपूर्ण राजकीय नाट्यमय घडामोडींवर बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, उदय सामंत हे नाशिकमध्ये होते. मात्र गीते हे मुंबईत माझ्यासोबत होते. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. नाशिकबाबत कुठलाही तिढा नाही. गणेश गीते यांनी सांगितले आहे की, मी माघार घेतोय. थोड्या वेळात त्यांची माघार होईल. गोकुळ गीते यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. गोकुळ गीते हे थोडे आग्रही आहेत. पण, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. ते देखील थोड्या वेळात आपली उमेदवारी मागे घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Ganesh Gite: गणेश गीतेंनी स्पष्ट केली भूमिका
दरम्यान, मुंबईतील वरिष्ठ पातळीवरील बैठकीनंतर गणेश गीते यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली. राज्यात आपली महायुती आहे आणि युतीचा धर्म आपल्या सर्वांना पाळावा लागेल, असे वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले. त्यामुळे मी नाशिक विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेत आहे," असे गणेश गीते यांनी सांगितले.
Gokul Gite: गोकुळ गीते माघार घेणार?
दरम्यान, गणेश गीते माघार घेत असताना गोकुळ गीते सध्या 'नॉट रिचेबल' आहेत. गिरीश महाजन यांनी गोकुळ गीते माघार घेतील असा विश्वास व्यक्त केला असला, तरी महाविकास आघाडी आणि इतर विरोधकांनी गोकुळ गीतेंच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे जर गोकुळ गीते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या अडचणी कमालीच्या वाढू शकतात. आता अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत हा सस्पेन्स काय वळण घेतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Who is Gokul Gite: कोण आहेत गोकुळ गीते?
गणेश गीते यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली असली, तरी गोकुळ गीते यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
- गोकुळ गीते हे नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे भाऊ आहेत.
- गणेश गीते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत गोकुळ गीते यांचा पडद्यामागून मोठा हातभार राहिला आहे.
- नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या संपूर्ण निवडणुकीचे नियोजन आणि कॅम्पेन गोकुळ गीते यांनीच सांभाळले होते.
- गोकुळ गीते हे पिंपळगाव बाजार समितीवर सलग दोन वेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत, तर सध्या त्यांची सायखेडा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे. स्थानिक पातळीवर त्यांची मोठी ताकद मानली जाते.
विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)
निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून
मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
मतमोजणी- 22 जून
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
