Nashik Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील (Nashik Vidhan Parishad Election 2026) निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्याबाबत मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने, दगाफटका टाळण्यासाठी नगरसेवकांना 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'अंतर्गत (Resort Politics) सहलीवर नेण्यात येत आहे. मात्र, मतदानापूर्वी भाजप नगरसेवकांना ठाण्यातील भिवंडी येथील एका रिसॉर्टवर नेण्याची तयारी सुरू असताना, भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांचा अतिउत्साहीपणा चांगलाच अंगलट आला आहे.
Nashik Vidhan Parishad Election 2026: माध्यमांना फोटो देण्याच्या नादात अपघात
भिवंडी येथील हॉटेल परिसरात नगरसेवकांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकाला केवळ माध्यमांना फोटो देण्याच्या नादात सुनील केदार यांनी सीटवरून खाली उतरवले. त्यांनी स्वतः ‘ड्रायव्हिंग सीट’वर बसून बसचे स्टेअरिंग हातात घेतले. मात्र, बस सुरू करताच त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि एक मोठा अनर्थ घडला. ती बस हॉटेलच्या आवारातील भिंतीला जाऊन जोरात धडकली. या धडकेत बसचे किरकोळ नुकसान झाले असून, सुदैवाने सर्व नगरसेवक सुरक्षित आहेत. मात्र, या प्रकारामुळे काही काळ हॉटेल परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.
Nashik Vidhan Parishad Election 2026: 'लक्ष्मीदर्शन' आणि 'भाव' फुटत नसल्याने कोंडी
या सहलीपूर्वी नाशिकमध्ये मोठे नाट्य पाहायला मिळाले. मतदारांना सुरक्षितता म्हणून सहलीवर नेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना मोठी मिन्नतवारी करावी लागली. मतांचा ‘भाव’ फुटत नसल्याने आणि जोपर्यंत ‘लक्ष्मीदर्शन’ होत नाही, तोपर्यंत आम्ही सहलीला येणार नाही, असा पवित्रा काहींनी घेतल्याने सहलीच्या समन्वयक नेत्यांची कोंडी झाली होती. अखेर काहींना टोकन देऊन, तर काहींना आश्वासनाचा ‘शब्द’ मिळाल्यानंतर सोमवारी (दि. 15) भाजपच्या 72 पैकी 66, तर शिवसेनेचे शहरांमधील 26 पैकी 25 नगरसेवक ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. ग्रामीण भागातील अनेक लोकप्रतिनिधी अद्यापही ‘वेटिंग’वर आहेत.
Nashik Vidhan Parishad Election 2026: दराडेंच्या कार्यपद्धतीवर मतदार नाराज
विधान परिषदेचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर आले असतानाही महायुतीतील मतदारांची नाराजी कायम आहे. गेल्या वेळी निवडून आल्यानंतर उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मतदारांकडे ढुकूंनही बघितले नसल्याने सर्वजण संतप्त आहेत. नगरसेवकांना पाचारण करण्यात आले तेव्हा त्यांनी ‘आमचे काय ते आधी बोला, मग आम्ही येतो,’ असा थेट पवित्रा घेतला होता. अखेर त्यांची समजूत काढून माजी महापौर हिमगौरी आहेर-आडके, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, उपमहापौर विलास शिंदे हे नगरसेवकांना घेऊन ठाण्याकडे रवाना झाले. ठाण्यात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के व आमदार रवींद्र फाटक यांच्यावर नगरसेवकांच्या निवासाची व व्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Nashik Vidhan Parishad Election 2026: नगरसेवकांच्या हातात दराडेंच्या नावाचा ‘व्हिप’
या निवडणुकीसाठी महायुतीकडे साडेचारशेहून अधिकचे स्पष्ट बहुमत आहे. तरीही अंतर्गत धुसफूस लक्षात घेता कोणताही दगाफटका नको म्हणून भाजपने कडक पावले उचलली आहेत. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनाच मतदान करण्यासंदर्भातील पक्षादेश म्हणजेच 'व्हिप' भाजपने नगरसेवकांना सोमवारी बजावला. सहलीसाठी वाहनात बसतानाच प्रत्येक नगरसेवकाच्या हातात पक्षाचा अधिकृत व्हिप ठेवण्यात आला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
