Nashik Shiv Sena UBT Jan Akrosh Morcha: नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Shiv Sena UBT) आक्रमक झाला आहे. खड्ड्यांच्या प्रश्नावरून आज नाशिक महानगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा (Jan Akrosh Morcha) काढण्यात आला आहे. या मोर्चासाठी नाशिकमधील ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांसह सामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नाशिक महानगरपालिकेवर धडकला आहे.
नाशिकच्या शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली असून, महानगरपालिकेपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून महापालिका प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या मोर्चाच्या ठिकाणी खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या सात नागरिकांचे फोटो लावण्यात आले आहेत. या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तसेच खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे. मोर्चामध्ये एका शिवसैनिकाने यमराजाचा वेश धारण केला आहे. नाशिकमधील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पावलेल्या नागरिकांच्या मृत्यूला आपण जबाबदार नसून प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत शिवसैनिकांकडून महापालिकेवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात येत आहे.
आंदोलनादरम्यान, खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) म्हणाले की, "आजपर्यंत शिवसेनेची ताकदच ही आहे की सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणूनच शिवसेनेकडे पाहिले जाते. आज जो प्रश्न नाशिककरांना भेडसावत आहे त्यासाठीच शिवसेना पुन्हा लढत आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांना मंजुरी मिळाली आहे असं शासनाचं सांगणं आहे. विकासाला कोणाचाच विरोध असण्याचं कारण नाही, परंतु कोणत्या पद्धतीने हा विकास व्हावा यासाठीच या अडचणी निर्माण झालेले आहेत. त्यातून मार्गाने निघावा, प्रशासनाचा लक्ष त्याकडे जावे म्हणूनच आम्ही हा मोर्चा काढलेला आहे."
दरम्यान, शिवसैनिकांनीही नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून प्रशासनावर टीका केली आहे. शिवसैनिक म्हणाले की, "खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये रोज एक अपघात होत आहे. हा जामनेरचा जळगावचा खड्डे महाकाल नाशिकमधून पहिले काढला पाहिजे, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल," असे म्हणत त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. शिवसैनिकांनी पुढे म्हटले की, "शहरावर भयंकर परिस्थिती आली आहे. काल संध्याकाळी सुद्धा चौदा वर्षाच्या मुलाचा खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाला. प्रशासनाला अजून पण जाग आलेली नाही. या आंदोलनानंतर खड्डे बुजवले गेले नाही तर सत्ताधारी नगरसेवकांच्या, मंत्र्यांच्या, आमदारांच्या घराबाहेर शिवसैनिक आंदोलन करतील," असा थेट इशारा देण्यात्न आला आहे.
नाशिकमधील खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही या आंदोलनातून सांगण्यात येत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅन चालकांनाही या समस्येचा मोठा फटका बसत असल्याचे समोर आले आहे. एक स्कूल व्हॅन महिला ड्रायव्हर म्हणाल्या की, "आम्हाला घरातून निघताना एक तास लवकर निघावे लागत आहे. त्यावर पालक आक्षेप घेतात आणि उशिरा शाळेत विद्यार्थ्यांना सोडल्यावर शाळेवाले आक्षेप घेतात. नेमकं आम्ही करायचं तरी काय? रस्त्यावरून जाताना खड्डे इतके असतात, एक गाडी चालवायची की उभी करायची हेच आम्हाला कळत नाही," असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, आजचा जनआक्रोश मोर्चा महापालिका प्रशासनासाठी इशारा मानला जात आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव जात असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे.
आणखी वाचा
