Pravin Tidme: आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
Pravin Tidme: नाशिक महापालिकेच्या उपमहापौरपदाच्या निवडीवरून शिवसेनेत निर्माण झालेल्या नाराजीवर अखेर तोडगा निघाल्याचे चित्र आहे.

Pravin Tidme: नाशिक महापालिकेच्या उपमहापौरपदाच्या निवडीवरून (Nashik Deputy Mayor Election 2026) शिवसेनेत (Shiv Sena) निर्माण झालेल्या नाराजीवर अखेर तोडगा निघाल्याचे चित्र आहे. शिवसेना महानगरप्रमुख तथा प्रभाग क्रमांक 24 चे नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे (Pravin Tidme) यांनी राजीनामा देण्याची घोषणा करून ‘नॉट रिचेबल’ झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, सोमवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रविण तिदमे यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
तिदमे यांनी सांगितले की, शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः माझ्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा केली आणि सर्व गैरसमज दूर केले. तसेच मला आणि इतर सर्व नगरसेवकांना मंगळवारी मुंबईत भेटीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार आणि जनभावनेचा आदर राखत मी महानगरप्रमुख पदाचा तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.
Pravin Tidme: ‘मी नाराज होऊन नॉट रिचेबल झालो नव्हतो’
पत्रकार परिषदेत बोलताना प्रविण तिदमे म्हणाले की, “मी स्वतः नाराज होऊन नॉट रिचेबल झालो नव्हतो. उपमहापौरपदाची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. त्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. सतत फोन, घराबाहेर गर्दी आणि ‘आपले नेमके काय चुकले?’ असे प्रश्न सुरू होते. या भावनांचा आदर म्हणून काही काळ मी नॉट रिचेबल राहिलो.”
Pravin Tidme: शिंदेंचा थेट हस्तक्षेप
तिदमे यांच्याशी संपर्क होत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. “स्वतः एकनाथ शिंदे यांनी ‘बंटीवर अन्याय होणार नाही. त्याला तातडीने माझ्याशी संपर्क साधायला सांगा,’ असा निरोप कुटुंबियांना दिला,” असे तिदमे यांनी सांगितले.
Pravin Tidme: राजीनामा न देण्याची सर्वांकडून विनंती
या काळात विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी तिदमे यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत राजीनामा न देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर रविवारी आणि सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, खासदार नरेश म्हस्के, आमदार सुहास कांदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मशीलकर, संपर्कप्रमुख राम रेपाळे यांच्याशी फोनवरून चर्चा झाली.
Eknath Shinde: ‘चुकीचा निर्णय घेऊ नकोस’
एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याने उपमहापौरपदाबाबतचे लेखी पत्र वेळेत नाशिकला पाठवले जाऊ शकले नाही. मात्र तुझ्यावर किंवा इतर नगरसेवकांवर कोणताही अन्याय होणार नाही. मला भेटल्याशिवाय चुकीचा निर्णय घेऊ नकोस.” या आश्वासनानंतरच राजीनामा न देण्याचा निर्णय घेतल्याचे तिदमे यांनी सांगितले.
आणखी वाचा
























