Nashik Shiv Sena: नाशिक महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि नाराजीनाट्य उघडपणे समोर आले आहे. शिंदे गटाचे नाशिक महानगर प्रमुख आणि नगरसेवक प्रवीण तिदमे (Pravin Tidme) यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केले आहेत. या घडामोडींमुळे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

नाशिक महापालिकेत सोमवारी झालेल्या निवडणुकीत महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके यांची, तर उपमहापौरपदी शिंदे गटाचे विलास शिंदे यांची निवड करण्यात आली. उपमहापौर पदासाठी शिंदे शिवसेनेकडून प्रवीण तिदमे यांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र भाजप–शिंदे गटाची युती झाल्यानंतर विलास शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिणामी भाजपचे मच्छिंद्र सानप आणि शिंदे गटाचे प्रवीण तिदमे यांनी अर्ज माघार घेतल्याने विलास शिंदे बिनविरोध विजयी झाले.

Pravin Tidme: प्रवीण तिदमे महानगर प्रमुख, नगरसेवकपदाचा देणार राजीनामा

या निर्णयानंतर प्रवीण तिदमे यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे उपनेते अजय बोरस्ते आणि नवनिर्वाचित उपमहापौर विलास शिंदे यांच्यावर टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षात वर्षानुवर्षे काम करूनही डावलले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रवीण तिदमे यांनी मोठा निर्णय घेतला असून, सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता ते महापालिका आयुक्तांकडे नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे नाशिक महानगर प्रमुख पदाचा राजीनामा सादर करणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे तिदमे यांच्या या निर्णयामुळे नाशिकमधील शिंदे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे शिंदे शिवसेनेतील अंतर्गत समन्वयाचा अभाव आणि गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली असून, आगामी स्थानिक राजकारणावर याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pravin Tidme Post: प्रवीण तिदमे यांनी केलेली पोस्ट  

एकनाथजी शिंदे साहेबांवर जेव्हा अन्याय झाला तेव्हा नाशिकमधून माझ्या राजकीय भविष्याची चिंता न करता नाशिकमधून मी सर्वप्रथम शिंदे साहेबांसोबत गेलो. 

नाशिकमध्ये शिवसेनेचा काळ अत्यंत कठीण असताना, कोणतीही अट-शर्त न ठेवता आणि कोणताही राजकीय सौदा न करता मी सर्वप्रथम पुढे येऊन शिवसेनेत प्रवेश केला. उबाठा गटाशी थेट संघर्ष करत, अनेक शिवसैनिक सोबत घेत संघटना उभी केली. पक्षकार्यासाठी पूर्णवेळ देता यावा म्हणून नोकरीसुद्धा सोडली.

सात वर्षांपासून असलेले म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्षपद आणि नाशिक महानगरपालिकेत असलेल्या केबिनचा पण त्याग केला. 

शाखा प्रमुख म्हणून गल्लीतून सुरुवात करून उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उप-महानगर प्रमुख, नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख आणि पुढे महानगर प्रमुख असा संपूर्ण संघर्षाचा प्रवास मी पदासाठी नव्हे, तर शिवसेना वाढवण्यासाठी केला. विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार कोणाचाही असो, शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन आघाडी घेतली.

माझ्या महानगर प्रमुख पदाच्या कार्यकाळात नाशिक शहरात नगरविकास निधीतून ३०० कोटींपेक्षा अधिक विकासकामे मार्गी लावली. नगरविकास निधी काय असतो हे तेव्हा नाशिकला माहीत झाले. 

स्वतःच्या प्रभागापुरते मर्यादित न राहता, इतर नगरसेवकांच्या प्रभागासाठी निधी मिळावा यासाठी मी सातत्याने धावपळ केली. पण, आज निष्ठावंत व संघर्ष करणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

एक वर्षे निगोसिएशन करून पक्षात आलेल्या अजय बोरस्ते यांना एकाच वेळी जिल्हा प्रमुख, उपनेते, शिवसेना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पद, नाशिक महापालिका गटनेते अशी चार महत्त्वाची पदे देण्यात आली.

त्यानंतरही अजय बोरस्ते यांनी सतत मीडियात बातम्या पेरल्या की, कार्यकारिणी बदलणार, महानगरप्रमुख बदलणार, सोशल मीडियावर पक्षाबद्दल संभ्रम कायम ठेवला. त्यामुळे, अनेक पक्ष प्रवेश ही थांबले. पण, कुणीच लक्ष दिले नाही.तसेच, दीड-दोन वर्षांनंतर पक्षात प्रवेश केलेल्या विलास शिंदे यांना सह-संपर्कप्रमुख, नाशिक आणि आता उपमहापौर, नाशिक अशी दोन पदे देण्यात आली.

एकीकडे संघर्ष, निष्ठा आणि संघटन उभारणी करणाऱ्या शिवसैनिकांना डावलले जात आहे आणि दुसरीकडे सौदेबाजी करून आलेल्यांना पदांची खैरात होत आहे, यामुळे पक्षातील अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी मी शिवसेना नाशिक महानगर प्रमुख पदाचा राजीनामा पक्ष नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब व मा. खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे सादर करणार आहे. तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा दुपारी 4.30 वाजता मा. नाशिक महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करणार आहे.

- प्रविण (बंटी) तिदमे

आणखी वाचा 

Nashik Mayor Election 2026: एकमेकांविरोधात लढलेले भाजप-शिंदे गट सत्तेत एकत्र; नाशिकमध्ये महापौरपदी हिमगौरी आडके, उपमहापौरपदी विलास शिंदे