Nashik Potholes: नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या (Potholes) प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकारण (Politics) तापले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (NCP Youth Congress) शहरात मोठे होर्डिंग (Hoardings) लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी (Nashik Guardian Minister) नियुक्ती थेट करावी, अशी मागणी केली आहे. 'दत्तक नाशिकचे पालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढा, ही सर्वसामान्य नाशिककरांच्या मनातील भावना आहे,' अशा आशयाचे होर्डिंग शहरात झळकू लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Nashik Potholes: खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकीय वातावरण तापलं
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली होती. त्यानंतर गिरीश महाजन स्वतः रस्त्यावर उतरले आणि संबंधित अधिकाऱ्यांना पुढील आठ ते दहा दिवसांत शहरातील सर्व प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले होते. या घडामोडींनंतर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने थेट राजकीय भूमिका घेत भुजबळ यांना पालकमंत्री करण्याची मागणी पुढे आणली आहे.
Nashik Potholes: 'नाशिकला अनुभवी पालकमंत्री मिळावा'
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी या मोहिमेमागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतल्याचे पूर्वी जाहीर केले होते. त्यामुळेच आम्ही त्यांच्याकडे ही मागणी केली आहे. नाशिकचे पालकमंत्रीपद सध्या रिक्त असल्याने प्रशासनावर प्रभावी वचक ठेवू शकणारे, नाशिकची जाण असलेले आणि भूमिपुत्र असलेले छगन भुजबळ यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात यावी. होर्डिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य नाशिककरांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
Nashik Potholes: खड्ड्यांच्या मुद्द्यावर ठाकरे गटही आक्रमक
दरम्यान, शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (Shiv Sena UBT) देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. 7 ऑगस्ट रोजी होणाऱ्या महापालिकेच्या विशेष महासभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रेक्षक गॅलरीत बसून प्रशासनाला जाब विचारावा, असेही आवाहन पक्षाने केले आहे. महानगर प्रमुख प्रथमेश गिते यांनी महापौरांकडे विशेष महासभेत कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनाही उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्याची मागणी केली आहे. कुंभमेळा प्राधिकरणामुळे नाशिककरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली. याशिवाय, 7 ऑगस्ट रोजी नाशिककरांच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चालाही ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पाठिंबा जाहीर करण्यात येणार आहे.
आणखी वाचा
