Narhari Zirwal on resignation: कुणाला मंत्रिपद द्यावं किंवा काढावं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार, ते निर्णय घेतील; नरहरी झिरवळांचं सूचक वक्तव्य
Narhari Zirwal on resignation: मंत्रालयात अधिकारी लाच घेताना सापडला, मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी कठोर शब्दांत झिरवळांना समज दिली.

Narhari Zirwal on resignation: मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन खात्याच्या कार्यालयातील लिपीक लाच घेताना रंगेहाथ सापडल्यामुळे अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आपल्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. कुणाला मंत्रिपद द्यावं आणि काढावं, हा मुख्यमंत्री महोदय यांचा अधिकार आहे. त्यामुळे सर्व निर्णय ते घेतील. बाकी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात माझे कोणी वैरी नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अद्याप माझे बोलणे झालेले नाही. मी त्यांना भेटणार असल्याचे नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी सांगितले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)
यावेळी नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणाबाबत भाष्य केले. मला या सगळ्याची सुस्पष्ट कल्पना नव्हती. माझं ऑफिस आणि अन्न न औषध प्रशासनाचे कार्यालय हे मंत्रालयात जवळ असले तरी प्रत्येक ओएसडीच्या कार्यालयात किंवा त्याच्या बसण्याच्या व्यवस्थेपाशी जाऊन कधी पाहण्याचा प्रसंग आला नाही. पण मंत्रालयात जो काही प्रकार घडला तो अत्यंत दयनीय आहे, हे कलंक लावणारं वर्तन आहे. मी तात्काळ लिपीक राजेंद्र ढेरंगे यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या राजेंद्र ढेरंगे हे पोलीस कोठडीत आहेत. मात्र, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करुन गोपनीय अहवाल देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. त्यानंतर राजेंद्र ढेरंगे यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे नरहरी झिरवळ यांनी सांगितले.
राजेंद्र ढेरंगे हे आपल्याकडे उसनवारी तत्वावर होते. ते अन्नपुरवठा विभागाचे कारकून होते. ते अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर आले होते. आपण सामान्य प्रशासन विभागाला पत्र देऊन त्यांना मूळ विभागात पाठवले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागात लाचखोरी सुरु असल्याच्या अनेक तक्रारी एसीबीला गेल्यामुळे त्यांनी ही कारवाई केली का, असा प्रश्न यावेळी नरहरी झिरवळ यांना विचारण्यात आला. त्यावर नरहरी झिरवळ यांनी म्हटले की, असे कधी घडले नाही. अन्न व औषध प्रशासन विभागात नेहमीप्रमाणे सुनावणी घेणे, स्टे देणे, निलंबित करणे आणि काही दिवसांमध्ये संबंधित गोष्टींची पूर्तता झाल्यावर परवान्याबाबत रिलीफ देणे, ही दैनंदिन प्रक्रिया सुरु होती. कधीही कोणावर बळजबरी करण्यात आली नाही, असा दावा नरहरी झिरवळ यांनी केला. राजू ढेंरेंगे यांनी कुठल्याही प्रकारे स्टेटमेंट दिलेले नाही की, लाचखोरीच्या प्रकरणात आमच्या ओएसडी यांचा सहभाग आहे. त्यांनी स्वतःसाठी लाच घेतली, अशी कबुली दिल्याचेही झिरवळ यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा
























