Narhari Zirwal: संपूर्ण राज्याच्या प्रशासनाचे केंद्र असलेल्या मंत्रालयातील कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले गेल्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात हा प्रकार घडला होता. या घटनेनंतर नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) हे अज्ञातवासात गेले आहेत. गेल्या काही तासांपासून नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. झिरवळ यांच्या कार्यालयातील राजेंद्र ढेरंग या कर्मचाऱ्याने एका मेडिकल दुकानदाराकडून 35 हजारांची लाच घेतली होती. हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी (एसीबी) राजेंद्र ढेरंग यांना रंगेहाथ पकडले गेले होते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री असलेल्या नरहरी झिरवळ यांची नाचक्की झाली होती. (Mantralaya Bribe case)

Continues below advertisement

या घटनेनंतर नरहरी झिरवळ यांनी संबंधित प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. या प्रकरणाशी माझा संबंध आढळून आल्यास मी राजीनामा देईन, असा खुलासा त्यांनी दिला होता. मात्र, या प्रकरणात नरहरी झिरवळ यांच्या खासगी पीएनेच राजेंद्र ढेरंग यांना पैसे घेण्यास सांगितल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. त्यामुळे याप्रकरणाचे धागेदोरे नरहरी झिरवाळ यांच्यापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नरहरी झिरवळ हे सध्या अज्ञातवासात गेल्याची चर्चा आहे. नरहरी झिरवळ यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करुन सर्वांशी संपर्क तोडला आहे. नाशिकमध्ये आज पहिले राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पार पडणार होते. मात्र, काल मंत्रालयात झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली. त्यामुळे मंत्री झिरवाळ हे अडचणीत सापडले आहेत. आजच्या संमेलनाला देखील झिरवाळ अनुपस्थित असल्याने आयोजकांचा हिरमोड झाला आहे. 

झिरवाळ आज 11 वाजता या संमेलनाला येणार होते. मात्र, नरहरी झिरवळ यांनी कोणताही निरोप दिल्याने आयोजक अनेक तास ताटकळत उभे होते. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्री नरहरी झिरवळ उद्या किंवा परवा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. सध्या सुरू असलेल्या चर्चा आरोप यावर ते मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण देणार आहेत. सध्या झिरवळ नाशिकमध्येच आहेत, दिल्लीला जाण्याचा प्लॅन नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Continues below advertisement

आणखी वाचा

नरहरी झिरवाळांच्या बचावासाठी अमोल मिटकरी मैदानात, म्हणाले, 'सुपारी देणारा कोण लवकरच समोर येईल'