नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात संघाच्या रेशीम बाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरासह ऐतिहासिक दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत, अशी माहिती आहे. प्रशासनाकडून कार्यक्रमाची रूपरेषा आखली जात असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुढीपाडव्याला नागपूरात आगमन होणार आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते थेट रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात जातील. त्या ठिकाणी संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे स्वागत केले जाईल.. यावेळी पंतप्रधान संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन करतील. त्यानंतर पंतप्रधान दीक्षाभूमी येथे जाण्याची शक्यता असून तेथे मोदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन करतील. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी यापूर्वीही नागपूर दौऱ्या दरम्यान दीक्षाभूमीला उपस्थिती दर्शविली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर माधव नेत्रालय येथे जाणार आहेत. नागपूर हिंगणा रोडवर वासुदेव नगर परिसरात संघप्रणित माधव नेत्रालयच्या नव्या वास्तूचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडेल. या ठिकाणी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेही उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी भारतीय सैन्यासाठी विशेष शस्त्र निर्माण करणाऱ्या सोलार इंडस्ट्रीजच्या उत्पादन प्रकल्पालाही भेट देणार असल्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात प्रशासन किंवा सोलार इंडस्ट्रीज कडून अंतिम दुजोरा आलेला नाही. 

पंतप्रधानांच्या या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दौऱ्यातील संपूर्ण मार्गाची पाहणी केली. या संपूर्ण मार्गावर भेट देऊन मनपा व पोलिस प्रशासनाद्वारे पाहणी करण्यात आली  असून आवश्यक ते निर्देश देण्यात आले.

अमित शाह 12 एप्रिलला रायगडावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त अमित शाह रायगड दौरा करण्याची शक्यता आहे. रायगड किल्ल्यावर जात अमित शाह शिवरायांना करणार अभिवादन करणार आहेत. त्यावेळी अमित शाहांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.

इतर बातम्या :

Sanjay Raut Kunal Kamra : कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...

कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया