Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
Modi Cabinet Reshuffle : भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या यादीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी आणि बी. एल. वर्मा यांचा पत्ता कट झाला आहे.

मुंबई : केंद्र सरकारमधील मोदी मंत्रिमंडळात (Modi Cabinet) लवकरच मोठ्या फेरबदलाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने (BJP) उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या 8 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, या यादीतून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी (Hardeep Singh Puri) आणि केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा (B L Verma) या दोन वजनदार मंत्र्यांची नावे गायब असल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या दोन्ही बड्या नेत्यांचा राज्यसभा कार्यकाळ 25 नोव्हेंबर 2026 रोजी संपत आहे. पुनर्नियोजन न झाल्याने या दोन मंत्र्यांची गच्छंती जवळपास निश्चित मानली जात असून रिक्त होणाऱ्या जागांवर कोणाची वर्णी लागणार? खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Hardeep Singh Puri Resignation : हरदीपसिंग पुरींची खुर्ची धोक्यात
शासकीय नियमांनुसार, कोणत्याही मंत्र्याला पदावर राहण्यासाठी संसदेच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य असणे अनिवार्य असते. हरदीपसिंग पुरी यांना सर्वप्रथम जानेवारी 2018 मध्ये उत्तर प्रदेशातून राज्यसभेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये ते पुन्हा बिनविरोध निवडून आले आणि 2024 मध्ये त्यांच्याकडे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मात्र, आता भाजपच्या नव्या यादीत नाव नसल्याने पुढील 6 महिन्यांच्या आत त्यांना पुन्हा राज्यसभेवर आणावे लागेल किंवा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. यामुळे पुरी यांच्या राजीनाम्याची उलटी गिनती सुरू झाल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात रंगली आहे.
Shrikant Shinde Cabinet Entry : शिवसेनेच्या 'वजन' वाढीमुळे श्रीकांत शिंदेंना लॉटरी?
दुसरीकडे, लोकसभेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदारांचे संख्याबळ आणि राजकीय वजन वाढले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे आता 13 खासदार आहेत. यामुळेच केंद्रात शिवसेनेला आणखी एक महत्त्वाचे कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या शर्यतीत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. हरदीपसिंग पुरी आणि बी. एल. वर्मा यांच्या गच्छंतीनंतर रिकामे होणारे मंत्रिपद भाजप स्वतःकडेच ठेवणार की शिंदे गटाला देऊन महायुतीतील मैत्री मजबूत करणार, यावर जोरदार राजकीय गणिते मांडली जात आहेत.
Modi Cabinet Expansion Criteria : 'एक व्यक्ती-एक पद' आणि दोन इतर मंत्र्यांची गच्छंती?
मंत्रिमंडळ फेरबदलाच्या या लाटेत इतर काही मंत्र्यांवरही टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. नुकतीच उत्तर प्रदेश भाजप अध्यक्षपदी निवड झालेले पंकज चौधरी आणि दिल्ली भाजप अध्यक्ष हर्ष मल्होत्रा यांच्याकडे सध्या केंद्रीय मंत्रिपदे आहेत. भाजपच्या 'एक व्यक्ती-एक पद' (One Person One Post) या धोरणानुसार या दोन मंत्र्यांची जबाबदारीही काढली जाण्याची दाट शक्यता आहे.
तसेच पंजाबमधून रवनीतसिंग बिट्टू आणि केरळमधून जॉर्ज कुरियन यांच्याबाबतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात मोठे राजकीय ऑपरेशन घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
ही बातमी वाचा:





















