Nagpur Lok Sabha: नागपूरमध्ये मतदानाचा टक्का घसरला, भाजपच्या स्थानिक नेत्यांना षडयंत्राचा संशय, आता थेट कोर्टात जाणार
Maharashtra Politics: नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात लढत आहे. यंदा नागपूरमध्ये मतदानाचा टक्का लक्षणीयरित्या घसरला होता. त्यामुळे राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे.
नागपूर: नागपूरातील मतदार याद्यांमधील चुकांचा मुद्दा आता न्यायालयाच्या दारी पोहोचणार आहे. कारण भाजपने या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. षडयंत्र करून नागपुरात (Nagpur) हजारो सामान्य मतदारांची नावे मतदार यादीतून हटवल्याचा आरोप स्थानिक भाजपकडून करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पहिल्या टप्प्यात नागपूरमध्ये मतदान झाले होते. मात्र, या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरल्याने राजकीय पक्ष चिंतेत पडले होते.
नागपुरात झालेला कमी मतदान आणि त्यासाठी मतदार याद्यांमधील गोंधळ जबाबदार असल्याच्या मुद्द्यावरून नागपुरात सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. प्रशासनाने नागपुरात यंदा 75 टक्क्यांपर्यंत मतदान वाढवू असा गाजावाजा केला. मात्र प्रत्यक्षात नागपुरात फक्त 54 टक्केच मतदान होऊ शकले. त्यानंतर भाजपसह अनेक पक्षांनी कमी मतदानासाठी मतदार याद्यांमधील गोंधळ जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तर प्रशासनानं बचावात्मक पवित्रा घेत मतदार यादीत वारंवार होणाऱ्या दुरुस्त्यासंदर्भात नागरिकांची उदासीनता कारणीभूत असल्याचा मुद्दा पुढे केला होता.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता भाजपनं मतदार याद्यांचा घोळ न्यायालयाच्या दारात नेण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच भाजपकडून नागपूरमधील मतदार याद्यांमधील चुकांसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. त्यासाठी भाजपने 19 एप्रिल रोजी ज्या ज्या मतदारांना मतदान करता आलेलं नाही, किंवा ज्यांना मतदानासाठी अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं अशा लोकांकडून माहिती गोळा करणे सुरू केले आहे. नागरिकांकडून सर्व माहिती गोळा केल्यानंतर त्याचा समावेश भाजपकडून केल्या जाणाऱ्या याचिकेत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नागपुरात नियोजनबद्ध पद्धतीने षडयंत्र करून हजारो सामान्य मतदारांची नाव मतदार यादी मधून डिलीट करण्यात आल्याचा आरोप ही भाजपने केला आहे.
नागपूरमध्ये नितीन गडकरींना काँग्रेसच्या उमेदवाराची कडवी टक्कर?
नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले आहे. तर काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती. विकास ठाकरे हे नागपूरमध्ये नितीन गडकरी यांना कडवी टक्कर देतील, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला होता. नितीन गडकरी यांच्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये नागपूर लोकसभा हा भाजपला बालेकिल्ला झाला आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्याने त्याचा फटका नेमका कोणाला बसणार? यामुळे विकास ठाकरे हे भाजपच्या नितीन गडकरी यांच्यासमोरच खरंच आव्हान निर्माण करणार का?, याचे उत्तर 4 जूनला मिळेल.
आणखी वाचा
उपराजधानीत अवघे 54 टक्के मतदान; 'शेम ऑन यू' म्हणत जागृत मतदारांनी थेट बॅनर झळकावत विचारला जाब