Mumbai Municipal Corporation : सध्या मुंबई महानगर पालिकेवर (Mumbai Municipal Corporation) भाजप (BJP) शिवसेना शिंदे गटाची (Shiv Sena) यांची सत्ता आहे. मात्र, या दोन्ही सत्ताधारी पक्षात सगळं काही ठीक असल्याचं चित्र दिसत नाही. कारण भाजप आणि शिंदेंसेनेतील अंतर्गत कुरघोड्या सुरुच असल्याचं समोर आलं आहे. शिंदेसेनेकडे असलेल्या सुधार समिती कामकाजाबाबत भाजप नगरसेवकांच्या तक्रारीनंतर आता शिंदे सेनेनेही भाजप संदर्भात तक्रार केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रतिनीधींचे प्रस्ताव सभागृहात पूर्वसूचनेशिवाय न वाचताच भाजपकडून तहकूब केले जात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप आहे.
भाजपच्या सभागृह नेत्यांकडूनच प्रस्ताव पूर्वसूचनेशिवाय तहकुब करण्याचा प्रकार
दरम्यान, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी (Sandhya Doshi) यांचे पती विपुल दोषी सुधार समितीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप भाजप नगरसॆवकांनी केला होता. मात्र, याबाबत भाजप नगरसेवकच विपुल दोषी यांचे मार्गदर्शन मागण्यासाठी येतात आणि ते समिती बैठकीत कुठेही हजर नसतात असे स्पष्टीकरण संध्या दोषींनी दिलं आहे. सोबतच, भाजपच्या सभागृह नेत्यांकडूनच प्रस्ताव पूर्वसूचनेशिवाय तहकुब करण्याच्या प्रकारावर संध्या दोषींनी नाराजी व्यक्त केली आहे. टाटा इन्स्टिटयूट ऑफ स्कील डेव्हलपमेंट हा शासकीय कामकाजाशी निगडीत प्रस्ताव पूर्वसूचना न देता सभागृह नेता गणेश खणकर यांनी तहकूब केल्याविषयी गटनेता अमेय घोले आणि सभागृह नेता गणेश खणकर यांना संध्या दोषींनी पत्र दिलं आहे. यावर सभागृह नेता गणेश खणकर यांच्याकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. महापौर, सभागृह नेते आणि गटनेते यांनी लक्ष घालावे पुन्हा असे प्रकार घडल्यास माझ्या पदाचा, पक्षाचा अवमान समजून सभात्याग करणे योग्य ठरेल असा इशार सध्या दोशी यांनी पत्रातून दिला आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची तब्बल 25 वर्ष सत्ता होती. मात्र, यावेळी त्यांनी फटका बसला आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यांना शिवसेना शिंदे गटाची साथ मिळाली.त्यामुळं मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली आहे. मात्र, सत्ता स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सगळं काही ठिक असल्याचं चित्र दिसत नाही. सातत्याने कोणत्या ना कोणत्या विषयांवरुन भाजप आणि शिवसेनेत कुरघोड्यांचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षातील नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.