MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) निवडणुकीचा  (Mumbai Cricket Association MCA) वाद आता मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) पोहोचला असून तूर्त उमेदवारांची यादी जाहीर करण्यास अंतरिम मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारी (6 नोव्हेंबर) होणाऱ्या सुनावणीनंतर या निवडणूक (MCA Election) प्रक्रियेचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, घटनेचे उल्लंघन होणे आणि नियमबाह्यपणे 155हून अधिक क्रिकेट क्लबला मतदार यादीत समाविष्ट करणे या मुद्द्यांवर एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांनी अॅड. स्नेहा फेणे यांच्यामार्फत रिट याचिकेद्वारे निवडणूक प्रक्रियेला आव्हान दिले आहे.

Continues below advertisement

अशातच 24 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होण्यापूर्वीच हळबे यांनी आक्षेप नोंदवूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याविषयी कारणमीमांसेसह रीतसर आदेश दिला नसल्याचा युक्तिवाद त्यांनी मांडला. तर ‘प्रारुप मतदारयादीविषयी 17 ते 20 ऑक्टोबर यादरम्यान आलेल्या आक्षेपांचा विचार केल्यानंतरच अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे. त्या प्रक्रियेत याचिकाकर्त्यांच्या आक्षेपांचाही विचार केला’, असे म्हणणे निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे अॅड. विश्वनाथ पाटील यांनी मांडले. मात्र, आपल्या आक्षेपांबाबत कारणमीमांसा देऊन आदेश काढला नसल्याचा युक्तिवाद हळबे यांच्यातर्फे मांडण्यात आला.

त्यानंतर मंगळवारीच संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आक्षेपांचा विचार करून कारणमीमांसेसह आदेश याचिकाकर्त्यांना कळवण्याची हमी निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे न्यायालयात देण्यात आली. तर 4 नोव्हेंबर रोजी छाननीअंती उमेदवारांची यादी जाहीर होणार होती. मात्र 6 नोव्हेंबरच्या पुढील सुनावणीपर्यंत ती यादी जाहीर करू नये, असे निर्देशही खंडपीठाने दिले.

Continues below advertisement

राजकीय नेत्यांच्या सहभागामुळे बहुरंगी निवडणूक

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अध्यक्षपदाची निवडणूक राजकीय नेत्यांच्या सहभागामुळे चर्चेत आली आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड (Prasad Lad), राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि शिवसेनेचे (UBT) मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी उडी घेतली आहे. 'क्रिकेटमध्ये कोणीही पक्षीय राजकारण आणू नये', असे वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर केले आहे. येत्या 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) आणि भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी (Diana Edulji) या सुद्धा शर्यतीत आहेत. एडलजी या एकमेव प्रमुख क्रिकेटपटू उमेदवार आहेत. याशिवाय, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) यांनीही अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बहुरंगी झाली आहे.