MNS MVA Mumbai Morcha: राज-उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नसल्याची माहिती, परवानगीविनाच मोर्चा काढलात तर.... भाजप नेत्याचा थेट इशारा
MNS MVA Mumbai Morcha: महाविकास आघाडी आणि मनसेच्या उद्याच्या मोर्चाला पोलीस परवानगी नसल्याची माहिती समोर येत आहे.

MNS MVA Mumbai Morcha: मतचोरी, मतदार यादीतील गोळ, दुबार मतदार आणि निवडणुकांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे यांनी एकत्रित येत उद्या (दि. 01 नोव्हेंबर) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) विरोधात सत्याचा मोर्चा काढण्याचं जाहीर केलं आहे. या मोर्चाला मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस नेते, डाव्या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रिटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमामार्ग मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल. मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी दुपारी 1 ते 4 या वेळेत मोर्चा निघणार आहे. मात्र, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि मनसेच्या उद्याच्या मोर्चाला पोलीस परवानगी नसल्याची माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडी आणि त्यांना समर्थन देणाऱ्या इतर पक्षांचा उद्या मुंबईत महामोर्चा निघणार आहे. या मोर्चाला सत्याचा मोर्चा असे नाव देण्यात आले आहे. या मोर्चासाठी महाविकास आघाडीने मुंबई पोलिसांकडे परवानगी पत्र पाठविले आहे. मात्र मुंबई महापालिकेचा मार्ग आणि आझाद मैदाचा परिसर येथून कुठलाही मोर्चा काढता येणार नाही. आझाद मैदानाच्या आत मोर्चा काढण्याची परवानगी आहे. त्यामुळे नियमानुसार आझाद मैदानाच्या बाहेर मोर्चा निघणार असेल तर त्याला परवानगी देता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे अद्याप या मोर्चा पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. आता पोलिसांकडून मोर्चाला परवानगी मिळत नसल्याने महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा विनापरवानगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
MNS MVA Mumbai Morcha: विनापरवाना मोर्चा काढला तर...
त्यातच आता राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी आणि मनसेला थेट इशारा दिला आहे. उद्याला मनसे व महाविकास आघाडीने विनापरवाना मोर्चा काढला तर नियमाप्रमाणे कारवाई होईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे विरोधक नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
MNS MVA Mumbai Morcha: मोर्चाला काँग्रेसकडून मोजक्याच नेत्यांची उपस्थिती
दरम्यान, सत्याच्या मोर्चाला उद्या काँग्रेसकडून मोजक्याच नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधी पक्षाच्या सत्याच्या मोर्चाला काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या इतर कोणत्या नेत्यांनी उपस्थित राहायचं? यासंदर्भात अजून निर्णय नाही. काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी बोलून इतर नेते मोर्चात सहभागी होण्या संदर्भात निर्णय घेणार आहेत. मोर्चात सहभागी होण्यासाठी विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांना सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बिहार निवडणुकीमुळे काँग्रेसचे नेते महाविकास आघाडी आणि मनसेपासून अंतर ठेवून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आणखी वाचा



















