Raj Thackeray & Devendra Fadnavis: राज ठाकरे-फडणवीसांची भेट आटोपताच चक्रं फिरली, आता मनसेचा बडा नेता उदय सामंतांच्या भेटीला
Raj Thackeray meets Devendra Fadnavis: वांद्र येथील ताज लँडस एन्ड येथे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीमुळे शिवसेना-मनसे युतीच्या चर्चेला ब्रेक लागल्याची चर्चा

Raj Thackeray & Mahayuti: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. कारण, गुरुवारी सकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली. तब्बल तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ही बैठक संपल्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोणतीही प्रतिक्रिया न देता हॉटेलबाहेर पडले. यानंतर काहीवेळातच मुंबईतील राजकीय हालचालींना वेग येताना दिसला. राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनंतर काहीवेळातच मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे हे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्या भेटीला पोहोचले आहत. संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे उदय सामंत यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी गेले आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे राज ठाकरे आणि महायुतीमध्ये पुन्हा एकदा वाटाघाटी सुरु झाल्याचे दिसत आहे. मनसेकडून आधी देवेंद्र फडणवीस आणि नंतर शिंदे गटाच्या नेत्यांशी चर्चेला सुरुवात करण्यात आली आहे. या चर्चेनंतर राज ठाकरे हे आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीशी हातमिळवणी करण्याची शक्यता बळावली आहे.
यापूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे आणि महायुतीमध्ये जवळीक होती. राज ठाकरे यांच्या मनसेसाठी महायुती जागा सोडेल, अशी चर्चा होती. मात्र, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे उभ्या असलेल्या माहीम मतदारसंघात शिंदे गटाने सदा सरवणकर यांना रिंगणात उतरवले होते. यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेने 125 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतरही मनसेला सत्तेत वाटा देण्यात आला नव्हता. त्यामुळे महायुती आणि राज ठाकरे यांच्यात काहीसे अंतर निर्माण झाले होते. अशातच गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित ताकद पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक यासारख्या महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. हीच गोष्ट ओळखून आता महायुतीने राज ठाकरे यांच्याशी वाटाघाटी करायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राज ठाकरे-फडणवीस आणि संदीप देशपांडे-उदय सामंत यांच्या भेटीतून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Sandeep Deshpande: उदय सामंतांच्या भेटीनंतर बाहेर येताच संदीप देशपांडे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतली याची कल्पना मला नाही. मी एक प्रस्ताव घेऊन उदय सामंत यांच्या भेटीला आलो होतो. पनवेलमध्ये फुलबाजार सुरु करायचा आहे. त्यासाठी मी उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी युतीची चर्चा वगैरे काही झाली नाही. युतीची चर्चा ही वरिष्ठ पातळीवर होते. कार्यकर्ते युतीची चर्चा करत नाहीत, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.
Uday Samant: दोन्ही भेटी आज झाल्या हा फक्त योगायोग: उदय सामंत
मनसेचे नेते संदीप देशपांडे हे नवी मुंबईतील एका विकासकामासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला आले होते. मात्र, एकनाथ शिंदे सह्याद्रीला गेल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर मला आणि श्रीकांत शिंदे यांना भेटले. राज साहेबांच्या संदर्भातील निर्णय एकनाथ शिंदे घेतील. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या आजच्या भेटीची आम्हाला कल्पना नव्हती. या दोन्ही भेटी फक्त योगायोग होता. पण उद्धव ठाकरे गटाने राज ठाकरे यांना अटी घालायला सुरुवात केली होती तेव्हाच मी म्हटले होते की, राज ठाकरे स्वाभिमानी आणि स्वतंत्र नेते आहेत. आज फडणवीसांची भेट घेऊन राज ठाकरेंनी तेच दाखवून दिले, असे उदय सामंत यांनी म्हटले.
आणखी वाचा
























