MNS on Ashish Shelar : महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आज (दि. 5 जुलै) वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला. यावरून मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे निवडणूकीत हरणार म्हणून कुटुंब तहात जिंकण्याचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. आता आशिष शेलार यांना मनसेने प्रत्युत्तर दिले आहे.
आशिष शेलार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, भाषेसाठी नाही ही तर निवडणूकीसाठी जाहीर मनधरणी! महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता "भाऊबंदकी" आठवली. ज्या भावाला घराबाहेर काढले, त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता. भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच आणि ते यांच्या लेखी नाहीच! महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार... त्यासाठी सत्ता.. यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे.. निवडणूकीत हरणार म्हणून कुटुंबतहात जिंकण्याचा प्रयत्न, असा हल्लाबोल त्यांनी केला.
आशिष शेलारांना मनसेकडून प्रत्युत्तर
तर आशिष शेलार यांना आता मनसे नेते गजानन काळे यांनी प्रत्युतर दिले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, शेलार मामाला पोटदुखी सुरू झाली आहे. निवडणुका आणि सत्तेसाठी भाजपाने उलट्या सुलट्या युत्या केलेल्या चालतात, पक्ष फोडलेले चालतात, भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध करून भाजपात घेतलेले चालते. कुटुंब फोडून राजकारण केलेलं चालतंय. मात्र, मराठी आणि महाराष्ट्रासाठी दोन ठाकरे यांनी एकत्र आले की यांना अपचन होते. अरे जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, असे म्हणत त्यांनी आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केलाय.
आणखी वाचा
