मुंबई : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामतीची ही जागा बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीमधील सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले. मात्र, काँग्रेसने उमेदवार जाहीर करत बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट केलं. आकाश मोरे यांना काँग्रेसने येथून उमेदवारी दिली. काँग्रेसच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांनी थेट इशाराच दिला. तसेच, काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल सुरूय असेही त्यांनी म्हटलं होतं. आता, पार्थ यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून त्यांचे बंधू आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही सल्ला दिलाय. 

Continues below advertisement

खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेससंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांनी पार्थ पवार यांचे चांगलेच कान टोचले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही पार्थ यांच्या प्रश्नावर स्मीतहास्य करत, नातवाला टोला लगावला. त्यानंतर, सुप्रिया सुळेंनीही पार्थ यांच्या वक्तव्यावर भूमिका मांडली. आता, आमदार रोहित पवार यांनी देखील पार्थ यांना जमिनीवर राहण्याचा सल्ला दिलाय. 

तुम्ही सत्तेत असला किंवा विरोधात असला, तुम्हाला जमिनीवर राहणं  महत्त्वाचं आहे. काल पार्थने जे विधान केलं ते योग्य नव्हतंच, कुठे ना कुठे घाईगडबड होती. कुठलाही पक्ष तसा संपत नसतो. सगळे पक्ष आपआपल्या पातळीवर ताकद लावत असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल बोलताना तो पक्ष संपला म्हणणं उचित नव्हतं, अशा शब्दात रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच, कालच्या विधानाबाबत आता जर पार्थला विचारलं तर तो कदाचित म्हणेल, काल थोडसं मी बोलून गेलो, माझ्या म्हणण्याचा दुसरा अर्थ काढला वगैरे. पण त्याचं विधान योग्य नव्हतंच. ते विधान घाईगडबडीत केलेलं आहे. तरीसुद्धा काकी स्वत: असतील, भुजबळसाहेब असतील किंवा कोणी ना कोणी काँग्रेसशी बोलेल आणि काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा देखील, रोहित पवारांनी व्यक्त केली. 

Continues below advertisement

शरद पवार, सुप्रिया सुळेंनी कान टोचले

शरद पवार यांनीही पार्थ यांच्यावरील प्रश्नावर उत्तर देताना स्मीतहास्य केलं. तसेच, 'मला असं वाटतं की राजकारणामध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांवर स्टेटमेंट करायला एकप्रकारची परिपक्वता लागते. ती कितपत आहे, हे आज मी सांगू शकत नाही', अशी प्रतिक्रिया दिली. तर, स्वातंत्र्य ही काँग्रेसची देण आहे. काँग्रेसचे योगदान खूप मोठे राहिले आहे. या देशाचे पंतप्रधान ते सरपंच, महिला आरक्षण, नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी आणलेले आर्थिक धोरण, या सगळ्याबाबात काँग्रेसचे योगदान नाकारुन चालणार नाही. मात्र, लोकशाहीत सगळ्यांना बोलण्याचा अधिकार असतो. त्यामुळे ते (पार्थ पवार) बोलत असतील, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनीही पार्थचे कान टोचले. 

हेही वाचा

Maharashtra Cabinet Meeting Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 धडाकेबाज निर्णय, महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार; AI, डीजिटल गव्हर्नन्सच्या प्रक्रियेला वेग येणार